Raybag Woman Farm Worker Snakebite Death
चिकोडी : नागपंचमीच्या दिवशी सर्वत्र नागदेवतेची पूजा-अर्चा सुरू असतानाच बेळगाव जिल्ह्यातील रायबाग येथे एका गरीब कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. शेतात काम करत असताना विषारी घोणस सापाने दंश केल्याने एका ४३ वर्षीय शेतमजूर महिलेचा रुग्णालयात नेत असतानाच दुर्दैवी मृत्यू झाला.
सत्यव्वा शिवानंद शिंगे (वय ४३, रा. डॉ. बी. आर. आंबेडकर नगर, रायबाग) असे मृत महिलेचे नाव आहे.
कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी सत्यव्वा सोमवारी नेहमीप्रमाणे शेतात तण उपटण्याच्या कामासाठी गेल्या होत्या. शेतात काम करत असताना दडून बसलेल्या विषारी घोणस सापाने त्यांना दंश केला. सर्पदंशानंतर काही वेळातच त्यांची प्रकृती झपाट्याने खालावली.
कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपचार मिळण्यापूर्वीच रुग्णालयाच्या वाटेत त्यांची प्राणज्योत मालवली.
नागपंचमीच्या दिवशीच कुटुंबाचा मुख्य आधार असलेल्या सत्यव्वा यांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने त्यांच्या मुलांसह नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. या घटनेमुळे रायबाग परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेची नोंद रायबाग पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.