Chikkodi Taluka Heavy Rain House Collapse
चिकोडी : मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार मुसळधार पावसामुळे एका घराची भिंत कोसळल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील जोडकुरुळी गावात घडली आहे.
हे घर गावातील रहिवासी गंगव्वा वराळे यांच्या मालकीचे असून, सततच्या पावसामुळे घराच्या भिंती पूर्णपणे कमकुवत झाल्या होत्या. घटना घडली तेव्हा कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र बसून जेवण करत होते. याच दरम्यान अचानक घराची भिंत कोसळली.
भिंत कोसळत असल्याचा अंदाज येताच घरातील सातही जणांनी प्रसंगावधान राखून तातडीने घराबाहेर धाव घेतली. त्यामुळे घरातील सातही जण सुदैवाने सुखरूप बचावले असून, मोठी जीवितहानी टळली आहे. केवळ थोडक्यात हा मोठा अनर्थ टळला.
या घटनेत घराचे प्रचंड नुकसान झाले असून, गरीब कुटुंब उघड्यावर आले आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, बाधित कुटुंबाला तात्काळ योग्य ती भरपाई देण्यात यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.