

बेळगाव : अथणी उत्पादन शुल्क विभागाच्या अखत्यारीत एका ग्राम पंचायत हद्दीतील मद्यविक्री दुकानात ग्राहकांकडून एमआरपीपेक्षा जादा दर आकारला जात असल्याचा आरोप करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे, संबंधित दुकानदारावर कारवाईची मागणी होत आहे. तसेच या प्रकारामुळे उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये संबंधित दुकानात मद्याच्या बाटल्यांवर प्रिंट केलेल्या किमतीपेक्षा (एमआरपी) अधिक पैसे आकारले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच दुकानाबाहेर दरपत्रक न लावता ग्राहकांकडून जादा रक्कम घेतली जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. बेळगावचे पोलिसप्रमुख के. रामराजन यांनी अवैध मद्यविक्रीविरोधात कठोर भूमिका घेत विविध ठिकाणी कारवाई सुरु केल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
दुसरीकडे एमआरपीपेक्षा जादा दर आकारणाऱ्या मद्यविक्री दुकानांची उत्पादन शुल्क विभागानेही तातडीने तपासणी करावी. व्हायरल झालेल्या या व्हिडिओची चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच सर्व मद्यविक्री केंद्रांवर दरपत्रक सक्तीने लावण्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी होत आहे.