अथणी : प्रार्थना बिरादार-पाटील हिचा सत्कार करताना गटशिक्षणाधिकारी एम. आर. मुंजे आदी  Pudhari
बेळगाव

Karnataka SSLC 10th Toppers | प्रेरणादायी यश ! दहावी परीक्षेत प्रार्थना बिरादार पाटील राज्यात अव्वल

प्रार्थना नागप्पा बिरादार-पाटीलने ६२५ पैकी ६२५ गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला

पुढारी वृत्तसेवा

Prarthana Biradar Patil Athani

अथणी : अथणी तालुक्यातील कटगेरी येथील सरकारी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी प्रार्थना नागप्पा बिरादार-पाटील हिने दहावी परीक्षेत ६२५ पैकी ६२५ गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. अत्यंत साध्या व ग्रामीण भागातून तिने मिळवलेले हे यश केवळ वैयक्तिक यश नसून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरत आहे.

मर्यादित साधनसामग्री, अभ्यासासाठी अपुरी सुविधा आणि स्पर्धेचे वाढते आव्हान या सर्वांवर मात करत प्रार्थनाने आपल्या जिद्दीच्या बळावर ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली. शाळेत शिकवलेल्या प्रत्येक धड्याची घरी जाऊन नियमित उजळणी, वेळेचे काटेकोर नियोजन आणि स्वअभ्यासावर दिलेला भर यामुळेच तिने पैकीच्या पैकी गुण मिळवण्याचा विक्रम घडवला. विशेष म्हणजे कोणत्याही खासगी शिकवणीशिवाय तिने हे यश संपादन केले आहे.

या यशानिमित्त अथणीचे गटशिक्षणाधिकारी एम. आर. मुंजे यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी सीआरसी गंगाधर कोष्टी, रमेश गस्ती तसेच तिचे पालक उपस्थित होते. विशेष म्हणजे तिच्या शाळेतच तिचे वडीलही शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. राज्यात प्रथम क्रमांक पटकावणारी ती एकमेव विद्यार्थिनी ठरली आहे. आ. लक्ष्मण सवदी यांनीही दूरध्वनीवरून तिच्याशी संवाद साधत अभिनंदन केले व पुढील शिक्षणासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

गटशिक्षणाधिकारी मुंजे म्हणाले, प्रार्थनाने यापूर्वी घेण्यात आलेल्या टॅलेंट परीक्षेतही जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला होता. त्यावेळी तिने एसएसएलसी परीक्षेत राज्यात अव्वल येण्याचा निर्धार केला होता. त्या निर्धाराला चिकाटीची जोड देत तिने आपल्या ध्येयाची पूर्तता करून दाखवली.

या यशाबद्दल प्रार्थना बिरादार म्हणाली, मी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन पुढे ‘नेट’ परीक्षा उत्तीर्ण होण्याचा मानस आहे. मी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण सरकारी शाळेतच घेतले. शाळेत शिकवलेले नीट समजून घेतल्यानंतर दररोज घरी त्याची उजळणी केली. मेहनत आणि सातत्य यावर माझा विश्वास होता.

तिचे मूळ गाव हल्याळ असून सध्या ती अथणी येथे वास्तव्यास आहे. प्रार्थनाच्या या यशामुळे एक महत्त्वाचा संदेश अधोरेखित होतो. परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, मेहनत, योग्य नियोजन आणि शिक्षक-पालकांचे मार्गदर्शन यांच्या जोरावर कोणतेही ध्येय साध्य करता येते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी चिकाटीने प्रयत्न करावेत, याचे जिवंत उदाहरण म्हणजे प्रार्थना बिरादार-पाटील होय. तिच्या या उज्ज्वल यशामुळे संपूर्ण परिसर अभिमानाने उंचावला असून अनेक विद्यार्थ्यांना नव्या उमेदीने पुढे जाण्याची प्रेरणा मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT