बेळगावरातील कुंदा विक्रीची दुकाने : १५०
रोज दोन हजार किलो कुंदानिर्मिती
प्रति किलो कुंदा दर : ३६० ते ५०० रु.
बेळगाव : पुढारी वृत्तसेवा बेळगाव शहराची ओळख ज्या खाद्यपदार्थाशी घट्ट जोडली गेली आहे, तो म्हणजे 'बेळगावचा कुंदा'. सुमारे शंभर वर्षांपूर्वी अपघाताने तयार झालेल्या या पदार्थाने आज आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. वर्षाला ३० कोटींची उलाढाल असलेला बेळगावचा कुंदा मात्र अद्याप जीआय मानांकनापासून वंचित राहिला आहे. बेळगाव कुंदाला जीआय टॅग मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली असून त्याला मंजुरी कधी मिळणार याची उत्सुकता आहे.
कर्नाटक राज्यात मैसूर सिल्क, धारवाड पेढा यासह ६० पेक्षा जास्त उत्पादनांना जीआय मिळालेला आहे. बेळगाव शहरात आणि आसपासच्या परिसरात मिळून दररोज अंदाजे दोन टन कुंदाचे उत्पादन केले जाते. शहरात कुंदा विक्रीची दीडशेहून अधिक दुकाने आहेत. उत्सव, सण आणि पर्यटनाच्या हंगामात ही मागणी तीन टनांपर्यंत पोचते. जुन्या मिठाई विक्रेत्यापासून ते गल्लीबोळातील लहान व्यापाऱ्यांपर्यंत शेकडो कुटुंबे या व्यवसायावर अवलंबून आहेत.
बेळगावमधून रोज महाराष्ट्र, गोवा आणि इतर राज्यांत शेकडो किलो कुंदा पाठवला जातो. बेळगाव कुंदासाठी जिल्हा उद्योग केंद्र आणि विश्वेश्वरय्या ट्रेड प्रमोशन सेंटर यांच्यामार्फत एप्रिल २०२५ मध्ये अर्ज दाखल करण्यात आला आहे. सध्या हा अर्ज 'परीक्षण' या टप्प्यात आहे. कुंदाचा उगम बेळगावात कसा झाला, त्याची विशिष्ट चव आणि गुणवत्ता स्थानिक हवामान, दूध किंवा विशिष्ट पद्धतीवर कशी अवलंबून आहे, याचे वैज्ञानिक आणि ऐतिहासिक पुरावे पुराव्यादाखल सादर करावे लागतात. बेळगाव कुंदाला जीआय टॅग मिळण्याची प्रक्रिया सुरू असून ती आता प्रशासकीय व कायदेशीर पडताळणीच्या टप्प्यात आहे.
जीआय टॅग मिळाल्यास बेळगावच्या कुंदाला आंतरराष्ट्रीय स्तरावर कायदेशीर संरक्षण मिळेल. स्थानिक दुग्ध उत्पादक शेतकरी आणि पारंपरिक मिठाई व्यावसायिकांचे आर्थिक उत्पन्न वाढेल. ब्रँडिंग आणि पॅकेजिंगमध्ये आधुनिकता येऊन निर्यातीची नवीन वारे उघडतील.