Bagasse Truck Fire
निपाणी: पुणे-बंगळुर राष्ट्रीय महामार्गावर कणगला हद्दीत निपाणीहुन बेळगावच्या दिशेने जाणाऱ्या बगॅस ट्रकला अचानकपणे आग लागली. या आगीत संपूर्ण ट्रक बेचिराख झाल्याने सुमारे कोटीचे नुकसान झाले आहे. सुदैवाने चालकाने उडी मारल्याने तो सुखरूप बचावला. ही घटना शनिवारी (दि.२०) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.
ट्रक चालक (नाव समजू शकले नाही) हा निपाणी येथून बेळगावच्या दिशेने आपल्या ट्रकमधून बगॅस भरून जात होता. दरम्यान हा ट्रक कणगला हद्दीत हिंदुस्तान लेटेक्स कंपनीसमोर आला असता ट्रकच्या पुढील भागाने अचानकपणे पेट घेतला. त्यामुळे ट्रकच्या पुढील बाजूने आग मोठ्या प्रमाणात भडकली. यावेळी संपूर्ण आगीने ट्रकची पुढील बाजू कवेत घेतल्याने या घटनेत कोटीचे नुकसान झाले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी रस्ते देखभाल अवताडे कंपनीच्या भरारी पथकाचे निरीक्षक अक्षय सारापुरे यांनी घटनास्थळी भेट देऊन संकेश्वर पोलीसासह अग्निशमन दलाला पाचारण केले. घटनास्थळी अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन आगीवर नियंत्रणाचा प्रयत्न करीत वाहतूक रोखून धरली.