Nipani Robbery | निपाणीत पोलीस घाईला अन् चोरटे रात्रपाळीला: पंधरा दिवसात १ कोटीचा मुद्देमाल लांबविला

उपनगरात फोडली दोन घरे;४ लाखाचा ऐवज लंपास
Nipani burglary case
घटनास्थळाचा तपास करताना सीपीआय बी. एस. तळवार शेजारी उपनिरीक्षक शिवानंद कार्जोळ आदीPudhari
Published on
Updated on

Belagavi Nipani burglary case

निपाणी : निपाणी शहर व उपनगरात गेल्या पंधरा दिवसापासून चोरट्यांचा दिवसाआड धुमाकूळ सुरूच आहे. गेल्या पंधरा दिवसात चोरट्यांनी आठ घरे व एक दुकान फोडून सुमारे ५० तोळे सोने व रोख रक्कम असा एकूण सुमारे १ कोटींचा ऐवज व मुद्देमाल लांबविला आहे. पोलिसांनी गेल्या पंधरा दिवसापासून दिवस रात्र गस्त चालवली असली तरी आता चोर सापडत नसल्याने पोलीस घाईला आले असून चोरटे मात्र रात्रपाळीसाठी कार्यरत असल्याचे दिसून येत आहे.

यामध्ये शुक्रवार रात्री भीमनगर येथे चोरट्यांनी दोन घरे फोडून साडेतीन तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम ४० हजार असा एकूण ४ लाखांचा मुद्देमाल व ऐवज लांबविला आहे. या घटनेमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले असून तपासणी यंत्रणेसमोर चोरट्यांनी पुन्हा आवाहन उभे केले आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, भीमनगर येथील रहिवासी निजाम सय्यद नगारजी हे टेलर व्यावसायिक असून गेल्या पंधरा दिवसांपूर्वी ते आपल्या यमगर्णी येथील नातेवाईकाकडे पत्नी समवेत दुचाकीवरून जात असताना दोघेही जखमी झाले होते. दरम्यान त्यांच्या पत्नीवर सध्या बेळगाव येथे उपचार सुरू असून त्या आपल्या मुलग्याकडे रहावयास असल्याने निजाम नगारजी हे दोन दिवसापूर्वी आपल्या बंगल्याला कुलुप लावून बेळगाव येथे गेले होते.

त्यांचा दुमजली बंगला असून वरच्या मजल्यावर त्यांनी भाडोत्री कुळ ठेवले आहे. दरम्यान शनिवारी सकाळी निजाम नगारजी यांच्या बंद बंगल्याचे कुलूप तोडून चोरी घडवून आणल्याचे त्यांच्या भाडेकरूंच्या लक्षात आले. त्यानुसार यांची माहिती निजाम नगारजी यांच्यासह निपाणीतील नातेवाईक सद्दाम नगारजी यांना देण्यात आली. त्यानुसार सद्दाम नगारजी व निजाम नगारजी यांनी घरात येऊन पाहणी केली असता नेमका चोरीचा प्रकार लक्षात आला.

यावेळी चोरट्यांनी आतमधील तिजोरी तोडून दोन तोळ्याचा नेकलेस, एक तोळ्याची चैन, अर्ध्या तोळ्याची अंगठी तर रोग रक्कम ३५ हजार असा एकूण सुमारे ४ लाख ऐवज व मुद्देमाल लांबवीत चोरट्यांनी घरातील साहित्य विस्कटून टाकल्याचे दिसून आले. त्यानुसार याची माहिती नगारजी यांनी पोलिसांना दिली. घटनास्थळी सीपीआय बी. एस. तळवार, शहराचे उपनिरीक्षक शिवानंद कार्जोळ, हवलदार सुदर्शन अस्की यांनी पाहणी करून नगारजी यांच्या फिर्यादीनुसार सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या घटनेचा तपास चालविला आहे.

दरम्यान, चोरट्यांनी भीमनगर तिसरी गल्ली येथील रहिवासी संतोष दिनकर जाधव यांच्या बंगल्याचे कुलूप तोडून आतमधील तिजोरी फोडून ऐवजाची व रोकडची पाहणी केली मात्र चोरट्यांना जाधव यांच्या घरातून कोणताही ऐवज व रोकड मिळाला नाही. जाधव हे आपल्या शिरगुपी येथील नवीन घरात राहावयास केल्याने त्यांनी हे घर बंद ठेवले होते.

पोलीस प्रशासन हतबल..

निपाणी शहर व उपनगरात गेल्या पंधरा दिवसापासून सातत्याने घरफोडीच्या घटना घडत आहेत. यामध्ये अष्टविनायक नगर, बिरोबा माळ, पंतनगर, शिवाजी नगर, चिकोडी रोड येथील आठ घरे व एक दुकान फोडून कोटींचा ऐवज व मुद्देमाल लंपास केला आहे. दरम्यान गेल्या दहा दिवसांपूर्वी माने प्लॉट येथे चोरट्यांनी बंदूकधारी पोलिसांवर धावून जाण्याचा प्रकार घडवून आणला होता. त्यानंतर तपास यंत्रणेने या घटनांचा तपासासाठी अनेक शक्यतेवर पथके स्थापन करून तपास चालविला असला तरी अद्यापही चोरटे हाती लागलेले नाहीत.यामध्ये पोलिसांची दिवस रात्र गस्त असली तरी आता पोलीस घाईला आले असून चोरटे मात्र रात्रपाळीसाठी सेवेत असल्याचे दिवसागणिक घडत असलेल्या घटनांवरून दिसून येत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन हतबल झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news