बेळगाव ः आंदोलक सफाई कामगारांसोबत आयुक्त अशोक दुडगुंटी, दीपक वाघेला, विजय निरगट्टी आदी. Pudhari Photo
बेळगाव

बेळगाव : ऑक्टोबर अखेर सफाई कामगारांच्या नियुक्त्या

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेच्या 154 सफाई कामगारांनी अखेर मंगळवारी (दि. 24) महापालिका आयुक्तांची भेट होईपर्यंत आंदोलन केले. आयुक्तांनी या कामगारांना 31 ऑक्टोबरच्या आत नियुक्तीपत्र देण्यात येईल, अशी ग्वाही दिली. त्यामुळे कामगारांनी आंदोलन मागे घेतले.

महापालिकेत कंत्राटी पद्धतीने काम करणार्‍या 154 सफाई कामगारांना जिल्हाधिकार्‍यांनी जानेवारी महिन्यातच नियुक्तीपत्र देण्याचे आदेश दिले होते. पण, त्यांना अद्याप नियुक्तीपत्र दिले नाही की त्यांना वेतन देण्यात आले नाही. त्यामुळे कामगारांनी सोमवारी महापालिकेसमोर आंदोलन केले. आयुक्त अशोक दुडगुंटी न्यायालयाच्या सुनावणीसाठी उच्च न्यायालयात गेले होते. त्यामुळे ते कामगारांना भेटू शकले नाहीत. त्यामुळे कामगारांनी आज पुन्हा महापालिकेसमोर आंदोलन केले.

आयुक्त दुडगुंटी कार्यालयात आल्यानंतर त्यांनी सफाई कामगारांच्या नेत्यांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी येत्या 31 ऑक्टोबरपर्यंत सर्व कामगारांना नियुक्तीपत्र देण्यात येईल. त्यासाठी अधिसूचना काढण्यात येणार असून कायदेशीर बाबी पूर्ण होण्यासाठी दीड, दोन महिने जाणार आहेत, असे सांगितले. यावेळी त्यांनी प्रशासन उपायुक्त उदयकुमार तळवार, पर्यावरण अभियंते हणमंत कलादगी आणि आरोग्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांची चांगलीच खरडपट्टी काढली. कामगारांना नियुक्तीपत्र देण्यात यापुढे हयगय झाली तर खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. यावेळी सफाई कामगारांच्यावतीने माजी नगरसेवक दीपक वाघेला, विजय निरगट्टी आदी उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT