बेळगाव : मराठी साहित्य समृद्ध आहे. अनेक कवी, लेखकांनी त्याला श्रीमंत बनविले आहे. अशा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्यानिमित्त आयोजित सोहळ्यात मराठी भाषेला श्रीमंत करणार्या कथा, कवितांचे वाचन झाले. नाट्य कलावंतांनी मराठी साहित्याचा अभिजातपणा गुरुवारी उलगडताना रसिकांना चिंब केले.
शहापूर सरस्वती वाचनालय आणि अभिजात मराठी संस्थेच्यावतीने अक्षरधारा कार्यक्रमाचे लोकमान्य नाट्यगृहात आयोजन केले होते. अभिनेते संजय मोने, आस्ताद काळे, ऐश्वर्या नारकर, उत्तरा मोने यांनी अभिजात मराठी साहित्यातील निवडक कथा, कविता, उतार्यांचे वाचन केले.
दीपप्रज्वलन कलाकारांसह वाचनालयाचे कार्याध्यक्ष सुहास सांगलीकर, प्रा. आर. एम. करडीगुद्दी, डॉ. संध्या देशपांडे, प्रा. डॉ. विनोद गायकवाड, आप्पासाहेब गुरव, अनंत लाड यांनी केले.
उत्तरा मोने म्हणाल्या, मराठी ही संतांची, वीरांची आणि समाजसुधारकांची भूमी म्हणून ओळखली जाते. मराठीचे मराठीपण अनेक अभिजात कलाकृतींनी बहरले आहे. अस्सल कलाकृतींचा आस्वाद प्रत्येक मराठी माणसांनी घेणे आवश्यक आहे.
संजय मोने यांनी पु. ल. देशपांडे यांच्या बिगरी ते मॅट्रिक, मी ब्रह्मचारी असतो तर, जयवंत दळवी यांचे सारे प्रवासी घडीचे, कुसुमाग्रज यांची गाभारा, विंदा करंदीकर यांची साठीची गझल या कथा-कविता सादर केल्या.
आस्ताद काळे यांनी व. पु. काळे यांची एक सिंगल चहा, विद्याधर पुंडलिक यांची आजी शरण येते, कुसुमाग्रज यांची रिटायर परमेश्वर, सुधीर मोघे यांची एकेक पाकळी या कविता-कथा सादर केल्या.
ऐश्वर्या नारकर यांनी मंगला गोडबोले लिखित त्यांचे आहे त्यांच्यापाशी, शांता शेळके यांचा लता, चिं. वि. जोशी यांचा नवलाईची बोटे, कुसुमाग्रज यांची जिगर हाय मम, मंगेश पाडगावकर यांची मज नव्हते ठाऊक आदी कथा कवितांचे सादरीकरण केले.
बेळगावमध्ये आल्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून आठवणी जाग्या होतात. बेळगावातील मराठी खूप समृद्ध आहे. त्याचबरोबर दीडशेहे वर्षापासून सुरू असणारे सरस्वती वाचनालयही बेळगावात आहे. त्यामुळे मराठी कधीच संपणार नाही, आशावाद मराठी कलाकारांनी व्यक्त केला.