हलगा सुवर्णसौधजवळ अपघात : ऊसवाहू ट्रॅक्टरला कारची धडक; १ ठार pudhari photo
बेळगाव

हलगा सुवर्णसौधजवळ अपघात : ऊसवाहू ट्रॅक्टरला कारची धडक; १ ठार

Belgav Accident : हलगा सुवर्णसौधजवळ अपघात : दोघे जखमी

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : उसाची ट्रॉली पलटी झाल्यानंतर मागून जाणाऱ्या कारची ट्रॉलीला जोरदार धडक बसली. यामध्ये कारचालक तरुण ठार झाला तर कारमधील अन्य दोघे तरुण जखमी झाले. सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास हलगा सुवर्णसौधजवळ हा अपघात घडला. गिरीश कृष्णा कुलकर्णी (मूळ रा. रामदुर्ग, जि. बेळगाव, सध्या रा. कुमार पार्क गोकुळ रोड, हुबळी) असे मृताचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, गिरीश व त्याचे दोघे मित्र वाढदिवस साजरा करण्यासाठी बेळगावला आले होते. वाढदिवस साजरा करून सोमवारी सकाळी ते हुबळीला कारमधून निघाले होते. हलगाजवळ कार गेली तेव्हा तेथून उसाने भरलेल्या दोन ट्रॉलींसह ट्रॅक्टर निघाला होता. दोनपैकी मागील ट्रॉली पलटी झाली. यावेळी मागून जाणाऱ्या भरधाव कारची या पलटी झालेल्या ट्रॉलीला जोराची धडक बसली. यामध्ये चालक तरुण गिरीश हा गंभीर जखमी होऊन मृत पावला. कारमधील प्रथम नितीन करीकट्टी (रा. हुबळी) हा गंभीर जखमी असून गिरीश बसाप्पा मकाळे (रा. हुबळी) हा किरकोळ जखमी झाला. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

ट्रॅक्टर चालकासह मृतावरही गुन्हा या घटनेची हिरेबागेवाडी पोलिसांत नोंद झाली आहे. पोलिसांनी प्रमाणापेक्षा अधिक ऊस भरून नेत रस्त्यावर पलटी करणारा ट्रॅक्टरचालक चंद्राप्पा भीमाप्पा हगेद (रा. हणमसागर, ता. रामदूर्ग) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. परंतु, मागून भरधाव जाऊन ट्रॅक्टरला धडक देत निष्काळजीपणा दाखवल्याचा ठपका ठेवत मृत गिरीश कुलकर्णी याच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मृताचे वडील कृष्णा बलराम कुलकर्णी (रा. हुबळी) यांनी हिरेबागेवाडी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT