डोंबिवली : कल्याण पश्चिमेतील संतोषी माता रस्त्यावरील आदर्श शाळेच्या पुढे भरधाव वेगात असलेल्या दुचाकीस्वाराने निष्काळजीपणाने दुचाकी चालवून एका 53 वर्षीय पादचाऱ्याला जोरात धडक दिली. या अपघातात पादचाऱ्याला गंभीर दुखापती झाल्या आहेत. हा अपघात गुरूवारी सकाळच्या सुमारास घडला.
राॅबर्ट डिझोझा असे गंभीर जखमी झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. दुचाकी स्वाराला राॅबर्ट डिसोझा आपल्या चुकीमुळे जखमी झाले आहेत हे माहिती असुनही त्यांना कोणतीही मदत न करता अपघात स्थळावरून निघून गेला. संतोषी माता रस्त्यावरील आदर्श शाळेच्या पुढे एलजी शोरुमच्या समोर हा अपघात घडला. या प्रकरणी राॅबर्ट डिसोझा यांनी दुचाकीस्वाराविरुध्द दाखल केलेल्या तक्रारीनुसार महात्मा फुले चौक पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार राॅबर्ड डिसोझा हे गुरूवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास चिकणघर येथील घरातून निघून संतोषी माता रस्त्याने जुन्या एचडीएफसी बँक शेजारी असलेल्या दुकानात औषध खरेदीसाठी गेले होते. औषध खरेदी करून ते पुन्हा पायी घरी चालले होते. एल. जी. शोरूम समोरून जात असताना पाठीमागून येत असलेल्या एका दुचाकीस्वाराने भरधाव वेगात निष्काळजीपणाने दुचाकी चालवली.
चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने चालकाने दुचाकीची राॅबर्ट यांना जोराची धडक दिली. या धडकेमुळे तक्रारदार जमिनीवर पडले. त्यांच्या हात, पाय, खांदा आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. यावेळी राॅबर्ट यांना वैद्यकीय मदतीसाठी साहाय्य करण्याऐवजी दुचाकीस्वार घटनास्थळावरून पसार झाला. हवालदार खरात या प्रकरणाचा तपास करत आहेत. अपघात घडल्या ठिकाणच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासून पोलीस दुचाकीस्वाराचा शोध घेत आहेत.