बेळगाव ः बेळगावचे अधिवेशन म्हणजे पूर्वी जत्रेपुरत्या येणार्या टुरिंग टॉकीज सिनेमासारखे झाले आहे. निर्णय काही होत नाहीत आणि वेळ तर वाया जातो, अशी टीका आमदार अभय पाटील यांनी केली. पोक्सोसारख्या संवेदनशील प्रकरणांकडेही सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. नुकत्याच आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, एका महिलेची नग्न धिंड काढण्यापासून ते पोक्सोसारख्या गंभीर व संवेदनशील प्रकरणांकडे गांभीर्याने पाहण्याची मानसिकता काँग्रेस सरकारची नाही. अशा प्रकरणांकडे दुर्लक्ष करणे व अधिकार्यांना पाठीशी घालणे, हे चुकीचे आहे. बेकायदेशीर धंदे, बाल अत्याचारसारख्या गंभीर प्रकरणांकडे दूर्लक्ष कसे करता येईल? बालअत्याचार प्रकरणे संवेदनशील असल्याने ती व्यवस्थितरित्या हाताळण्याची गरज आहे. त्यात कुणी राजकारणी हस्तक्षेप करत असतील तर पूर्णतः चुकीचे आहे. राजकारण्यांचे ऐकून जर कुणी पोलिस अधिकारी गुन्हा दाखल करून घेण्याकडे टाळाटाळ करत असतील अशा अधिकार्यांना निलंबित करावे, अशी गृहमंत्र्यांना विनंती करत असल्याचेही त्यांनी सांगितले. महिला व लहान मुला-मुलींबाबतची प्रकरणे बारकाईने हाताळण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
पूर्वी यात्रांमध्ये टुरिंग टाकीजचे सिनेमे येत असत. त्या टुरिंग टॉकीजसारखी अधिवेशनाची अवस्था झाली आहे. ते कधी होते व कधी संपते, काहीच कळत नाहीत. निर्णय तर काही होत नाहीत. डिनर पार्टी करायची अन् दुसर्या दिवशी 11 नंतर अधिवेशनात हजर राहायचे. दहा दिवसांत एकूण किती तास अधिवेशन चालले व त्यातून निष्पन्न काय झाले, हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. यातून बेळगाव आणि उत्तर कर्नाटकच्या विकासावर काय चर्चा होणार आणि गती कशी येणार, असा प्रश्न आमदार पाटील यांनी उपस्थित केला.