बेळगाव, खानापूर : बेळगाव-धारवाड रेल्वेमार्गासाठी 1200 एकर जमीन संपादित करण्यात आली असून, 937 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. आता फक्त 40 एकर जागेचे संपादन शिल्लक आहे. ते होताच कामाला युद्धपातळीवर सुरुवात होईल, अशी माहिती रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांनी सोमवारी दिली. सोमण्णांच्या हस्ते बेळगावात भुयारी मार्गाची कोनशीला आणि खानापुरात रेल्वे स्थानकाच्या विकासकामांचे भूमिपूजन झाले. त्यावेळी पत्रकारांना त्यांनी ही माहिती दिली.
बेळगाव-धारवाड हा 73 किमीचा रेल्वेमार्ग नव्याने बांधण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवासाचा कालावधी सुमारे एक तासाने कमी होणार आहे. मात्र बेळगाव तालुक्यातील भूसंपादन शेतकर्यांच्या विरोधामुळे रखडले आहे. ते सुमारे 40 एकरांचे संपादन लवकरच होईल, असेही मंत्री म्हणाले. खानापूर स्थानकावर बोलताना मंत्री सोमण्णा म्हणाले, खानापूर तालुका वैशिष्ट्यपूर्ण आहे. रेल्वेच्या पायाभूत सुविधा व विकासकामांसाठी 11 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
रेल्वे स्थानकावर विकास कामांचे भूमिपूजन मंत्र्यांनी केले. यावेळी खासदार विश्विेश्वर हेगडे-कागेरी, खासदार इराण्णा कडाडी, आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील, भाजप जिल्हा अध्यक्ष सुभाष पाटील, उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी आदी उपस्थित होते.
मंत्री सोमण्णा म्हणाले, प्रवाशांना मूलभूत सुविधा देण्यासाठी येथील रेल्वे स्थानकाशेजारी 3 कोटी रुपये खर्चाच्या भुयारी पुलाची उभारणी करण्यात येणार आहे. जून 2026 पर्यंत हे काम पूर्ण होईल. अळणावर-दांडेली रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. पुढील महिन्यात या मार्गावर रेल्वे सेवा सुरू होतील. लोंढा-मिरज मार्गावरील 186 किमी विद्युतीकरणाचे कामदेखील पूर्ण झाले आहे.
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या काळात देशभरातील रेल्वे स्थानके, रेल्वे मार्ग आणि गाड्यांचे अपग्रेडेशन करण्यात आले आहे. सध्या देशभरातील रेल्वे स्थानके विमानतळांपेक्षाही चांगली झाली आहेत. रेल्वे विभागाने 29,000 कोटी रुपयांच्या अनुदानातून अनेक लोकहिताची कामे हाती घेतली आहेत. बेळगाव आणि खानापूर स्थानके मॉडेल स्थानके बनवण्यासाठी रेल्वे विभागाने एक विशेष कृती आराखडा तयार केला आहे, असे मंत्र्यांनी स्पष्ट केले.
खासदार कागेरी म्हणाले, खानापूर रेल्वे स्थानकाच्या दोन नंबरच्या प्लॅटफॉर्मवर 450 मीटर लांबीचे निवाराशेड बांधकाम, प्रतीक्षालय, गाड्यांच्या आगमन आणि प्रस्थानाची माहिती देण्यासाठी स्थानकावर डिस्प्ले बोड बसवला जाईल.
खानापूर तालुक्याीतील अनेक संघटना आणि नागरिकांनी मंत्र्यांकडे पंढरपूरला जाणार्या भाविकांसाठी वास्को-पंढरपूर पॅसेंजर ट्रेन सेवा सुरू करावी तसेच बेळगाव-बेंगळू, वास्को-निजामुद्दीन एक्सप्रेस गाड्यांना खानापूर येथे थांबण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशा मागण्या केल्या.
सोमवारी मंत्री सोमण्णा आणि मान्यवरांनी हुबळी-दादर ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. ही ट्रेन रोज खानापूर स्टेशनवर 1 मिनिट थांबेल. 15 सप्टेंबरपासून ही ट्रेन दररोज संध्याकाळी 5.55 वाजता खानापूर रेल्वे स्टेशनवर पोहोचेल आणि 5.56 वाजता बेळगावला रवाना होईल. त्याचप्रमाणे दादर-हुबळी ट्रेन (ट्रेन क्रमांक 17318) सकाळी 8.40 वाजता पोहोचेल आणि सकाळी 8.41 वाजता हुबळीला रवाना होईल.