केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Pudhari File Photo
बेळगाव

बेळगाव ‘बायपास’साठी 800 कोटी

पुढारी वृत्तसेवा

निपाणी : पुढारी वृत्तसेवा

बेळगाव बायपास रस्त्यासाठी 800 कोटी रुपये, गोवा-हैदराबाद रस्त्याच्या विकासासाठी अनुदान दिले जाईल, असे केंद्रीय महामार्ग आणि भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. शुक्रवारी (दि. 4) केएलईचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे आणि आशा कोरे यांचा नागरी सत्कार आणि विद्यासंवर्धक मंडळाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनावेळी मंत्री गडकरी बोलत होते. गडकरी म्हणाले, देशातील प्रत्येक भागात, प्रत्येक क्षेत्रात विकास साधण्याचे केंद्र सरकारचे ध्येय आहे. आर्थिक स्थिती, पिण्याचे पाणी, रोजगार, आरोग्यासह सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा देण्याकडे लक्ष दिले जात आहे.

मंत्री गडकरी पुढे म्हणाले, निपाणीसह परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादन घेतले जाते. त्यामुळे आर्थिक स्थिती वेगळी आहे. आम्हाला शेतकर्‍यांचा विकास करायचा आहे. उत्पादन क्षेत्रात विकास दर अधिक आहे. पण, एकूण उत्पादनापैकी केवळ 14 टक्के वाटा कृषीचा आहे. महात्मा गांधींनी 70 टक्के लोक ग्रामीण भागात राहत असल्याचे सांगितले होते. आता त्यापैकी 30 टक्के लोक शहराकडे स्थलांतरित झाले आहेत. ग्रामीण भागात शिक्षण, आरोग्याची स्थिती योग्य नाही. इमारत असली तरी शिक्षक नाहीत.

डेअरी व्यवसायात आवश्यक सुविधा नाहीत. बाजारपेठेत अधिक दर मिळत असला तरी शेतकर्‍यांना उत्पादनानुसार दर नाही. ग्रामीण भागात सुविधा नसल्याने विकास अशक्य आहे. आज देशभरात 14 लाख डॉक्टरांची कमतरता आहे. डॉ. प्रभाकर कोरे यांनी या भागाच्या विकासासाठी आवश्यक अशा शिक्षण संस्था सुरू कराव्यात. आर्थिक प्रगतीसाठी नवे मार्ग शोधावेत. येथे इंजिनिअरिंग केलेल्यांना जगभरात मागणी आहे. आज इथेनॉलचा वापर इंधन म्हणून करणे शक्य झाले आहे. प्रतिलिटर 25 रुपये असा याचा दर आहे. आणखी काही वर्षांमध्ये पेट्रोलऐवजी इथेनॉलचे पंप दिसू लागतील, असे भाकीत त्यांनी केले.

बेळगावसाठी योजना आखाव्यात : सतीश जारकीहोळी

राज्यातील रस्ते, रेल्वे संपर्कासाठी योजना आखण्याचे निवेदन केंद्रीय मंत्री गडकरी यांना दिल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. आगामी काळात बेळगावसह परिसरात अनेक योजना राबवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT