बेळगाव ः पुढारी वृत्तसेवा
अल्पवयीन मुलीला बळजबरीने मोटर सायकलवर बसवून घेत जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी युवकाला 20 वर्षांचा सश्रम करावास आणि दहा हजार रुपयांचा दंड अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालय तसेच विशेष जलदगती पोक्सो न्यायालयाच्या न्यायाधीश सी. एम. पुष्पलता यांनी बजावला.
अरबाज रसूल नालबंद (वय 19, रा. रायबाग) असे आरोपीचे नाव आहे. अल्पवयीन मुलगी 29 मे 2018 रोजी रस्त्याने चालत जात असताना अरबाजने तिला ’तुला घराकडे सोडतो’ असे सांगून आपल्या मोटर सायकल बसण्यास सांगितले. मात्र, अल्पवयीन मुलीने मोटर सायकल बसण्यास नकार दिला. तरीही आरोपीने तिला बळजबरीने मोटर सायकलवर बसवून घेतले. त्यानंतर मोटर सायकल जंगल भागाकडे वळविली. त्यावेळी मुलीने, ’आपले घर इकडे नसून भलतीकडे का घेऊन जात आहेस’, अशी विचारणा केली असता ’माझ्या आईला आराम नाही, त्यामुळे जंगलात जाऊन झाडपाला आणू’ असे सांगून तिला जंगल परिसरात नेले. नंतर तिच्यावर अत्याचार केला.
याप्रकरणी रायबाग पोलिसांत पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला. तपास अधिकार्यांनी पोक्सो न्यायालयात दोषारोप दाखल केल्यानंतर न्यायालयात 17 साक्षी, 41 कागदपत्रे आणि आठ मुद्देमाल तपासण्यात आले. आरोप सिद्ध झाल्याने न्यायाधीश सी. एम. पुष्पलता यांनी आरोपीला वीस वर्षाचा सश्रम कारावास आणि दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच पीडित मुलीला एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा आदेश जिल्हा कायदा प्राधिकरणाला बजावला. सरकारी वकील म्हणून अॅड. एल. व्ही. पाटील यांनी काम पाहिले.