बेळगाव : सातवीत शिकणार्या 13 वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाल्याच्या घटनेची नोंद मंगळवारी (दि. 2) झाली आहे. मुरगोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावाला लागून असलेल्या शेतवडीत 23 नोव्हेंबर रोजी ही घटना घडल्याचे अत्याचारित मुलीच्या पालकांनी फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी या गावातीलच मणीकंठ दिन्नीमनी व इराण्णा संकमण्णावर या दोघा तरुणांवर ‘पोक्सों’तर्गत गुन्हा दाखल करून तातडीने अटक केली.
न्यायालयासमोर उभे केले असता त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली. याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, 23 नोव्हेंबर रोजी शाळेला सुट्टी असल्याने मुलगी घरी होती. तिला आईने गिरणीत जाऊन दळण ठेवण्यास सांगितले. मुलगी पिठाच्या गिरणीकडे जात असताना दबा धरून बसलेल्या उपरोक्त दोघा नराधमांनी तिला उचलून बाजूच्या उसाच्या शेतात नेले.
तिथे तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. घरी कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याने मुलगी मानसिक धक्क्यात होती. परंतु, ती शांत राहत असल्याचे लक्षात आल्याने पालकांना संशय आला. विश्वासात घेऊन विचारणा केली असता तिने घडला प्रकार सांगितला. पालकांनी मुरगोड पोलिस ठाणे गाठून याबाबत फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी याची नोंद करुन घेत संशयितांना अटक केली.
याबाबत जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद म्हणाले, घटना घडल्यानंतर इतक्या दिवसांनी फिर्याद का दिली, याचाही तपास आम्ही करत आहोत. सदर तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिच्यासाठी एका महिला पोलिस अधिकार्याची नियुक्ती केली आहे. गरज पडल्यास या मुलीच्या कुटुंबियांना सुरक्षा पुरविली जाईल, असे त्यांनी सांगितले.