Latest

Terrorist : दहशतवाद्यांचा म्होरक्या बीडचाच?

अमृता चौगुले

पुणे : दहशतवादासाठी मराठवाड्यातील तरुणांचे ब्रेनवॉश करून त्यांच्या मदतीने स्फोटके आणि शस्त्रसाठा पाठवला जात होता. यासाठी छ. संभाजीनगर, बीड, धाराशिव व मालेगावसारख्या शहरांची निवड करण्यात आली. 26/11 साखळी बॉम्बस्फोटानंतर वेरूळमध्ये सापडलेली स्फोटके आणि शस्त्रसाठात बीडच्या जैबुद्दिन अन्सारीचे नाव समोर आले होते. एटीएसचे तत्कालीन महासंचालक रघुवंशी यांनी केलेल्या तपासानंतर मराठवाडा दहशतवादी कारवायांचे केंद्र असल्याचे उघड झाले होते.

एटीएसने ते जाळे पूर्णत: नेस्तनाबूत केल्यावर स्लीपर सेलने पुण्यातील उपनगरे या कारवायांसाठी निवडली होती. कुणाच्या लक्षात येऊ नये यासाठी आयटीचा जॉब आणि शिक्षणाचे कारण समोर करीत अनेक तरुण इतर तरुणांना त्यांच्या जाळ्यात ओढत असल्याचे समोर आले असून, टोळीचा म्होरक्या बीडमध्येच असल्याची शंका तपास यंत्रणेला आहे. अन्सारीचा रोल कोणीतरी करत असून, त्याचा शोध घेण्यासाठी यंत्रणा सतर्क झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुंबईत झालेल्या 26/11च्या बॉम्बस्फोटात बीडच्या जैबुद्दिन अन्सारीचे नाव आले अन् त्यानंतर वेरूळ येथे सापडलेला शस्त्रसाठा ते पुण्यातील जर्मन बेकरी प्रकरणाची लिंक थेट मराठवाड्याशी असल्याचे समोर आले होते. बीड शहरात राहणारा जैबुद्दिन हा मुंबई बॉम्बस्फोटानंतर पाकिस्तानात एका मोठ्या दहशतवादी गटाचा म्होरक्या म्हणून कार्यरत असल्याची माहिती एटीएस पथकास मिळाली होती.

कोणाचे लक्ष केंद्रित होणार नाही आणि स्लीपर सेलच्या मदतीने जैबुद्दिनने सिमीच्या माध्यमातून सुरुवातीला बीड, धाराशिव आणि मालेगावसारखी स्थळे निवडत दहशतवादी प्रशिक्षण कारवाईसाठी केंद्र निवडले होते. एटीएस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यात झालेल्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणाची लिंक बीडपर्यंत असल्याची शक्यता वर्तवली गेली होती. कारण छ. संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ लेणीजवळ 2006 मध्ये 36 किलो आरडीएक्स एके 47 सेवन सह मोठा शस्त्रसाठा सापडला होता. अतिरेकी कारवायांसाठी मुंबई, दिल्लीनंतर महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर शहराला टार्गेट करण्यात आले होते.

बीडवर एटीएसचे पुन्हा लक्ष

बॉम्बस्फोट मालिकांचा मास्टर माईंड समजला जाणार्‍या अन्सारीनंतर कोण जबाबदारी सांभाळत आहे, याचा शोध घेतला जात असून, एटीएसचे पथक सक्रिय झाले आहे. पुण्यात अटक करण्यात आलेल्या तरुणांच्या जबाबानंतर विशेष लक्ष बीडवर ठेवण्यात आले आहे. कारण वेरूळ शस्त्रसाठा हा बीडकडे जाणार होता. म्हणजे दहशतवादी कारवायांचे केंद्र मराठवाड्यातील बीड निवडल्याचे तपास यंत्रणांच्या लक्षात आले होते. पुण्यात सुशिक्षित तरुणांना जाळ्यात ओढल्यानंतर त्यांना दिले जाणारे संकेत आणि आदेश हे थेट मराठवाड्यातून येत असल्याचे तपास यंत्रणांच्या लक्षात आले. म्हणूनच एटीएस सह एनआयएची तपास यंत्रणा अनेकांना बोलावून जबाब नोंदवत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

माजी महासंचालकांची मदत

वेरूळ शस्त्रसाठा प्रकरणात महत्त्वाची भूमिका असून, एटीएसच्या माजी महासंचालकांची एनआयए मदत घेत असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. मुंबई व दिल्लीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या मालिकेचा मास्टर माईंड मराठवाड्यातील असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याच्या संपर्कात असलेल्या अनेकांशी संपर्क साधला जात आहे. विशेष म्हणजे त्या वेळी सिमीमध्ये काम करणार्‍या सक्रिय नेत्यांनादेखील पुन्हा चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT