नवी मुंबई: पुढारी वृत्तसेवा : मागील १९ दिवसापासून बीड ते मुंबई असा ४०० किमीचा प्रवास पायी करत उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक आज (मंगळवार) नवी मुंबईत पोहोचले. स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर श्रद्धा असल्याने त्यांनी पायी प्रवास केला. सानपाडा दत्त मंदिरात त्यांची जेवणाची सोय करण्यात आली होती.
शिवसेनेचा बुधवारी (दि.५) दसरा मेळावा होत आहे. या मेळाव्यासाठी विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातून मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत. शिंदे गटाच्या बरोबरीने ठाकरे गटाने ही तयारी केली आहे. या दसरा मेळाव्यासाठी बीड जिल्ह्यातील शिवसैनिकांनी पाय चालत मुंबई शिवतीर्थीवर उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यासाठी थेट ४०० किमी बीड ते मुंबई असा पायी चालत प्रवास करत नवी मुंबईत दाखल झाले.
ठिकठिकाणी मुक्काम करत १९ दिवसांनंतर ते नवी मुंबईतील सायन पनवेल महामार्गावर सानपाडा दत्त मंदिरात त्यांनी जेवणाची पंगत घेतली. जेवण बनविण्यासाठी महिलाही या प्रवासात सोबत आहेत. बाळासाहेबांचे कट्टर समर्थक आणि शिवसैनिक आहोत. त्यामुळे यावर्षी उद्धव ठाकरे यांच्यासाठी शिवसैनिक पायी चालत दसरा मेळाव्यासाठी आल्याचे बीडच्या शिवसैनिकांनी सांगितले. काल सोमवारी त्यांचे पनवेलमध्ये आगमन होताच रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांनी स्वागत केले. त्याच्या राहण्याची व्यवस्था आणि जेवणाची सोय स्थानिक पातळीवर करण्यात आली आहे.
हेही वाचलंत का ?