Beed Crime : राष्ट्रीय महामार्गावरील रांजणीजवळ एका नाल्यात मानवी सांगडा आढळून आला होता. त्यामुळे खळबळ उडाली होती. हा सांगाडा महिलेचा आहे, असा अंदाज गेवराई पोलिसांनी वर्तविला होता. तो अखेर खरा ठरला. खुद्द आतेभावानेच महिलेचा खून केल्याची घटना समोर आलीय. (Beed Crime) राधा माणिक गायकवाड (वय ३५, रा. इंदेवाडी तालुका, जिल्हा जालना) असे महिलेचे नाव आहे.
जालना तालुका पोलिस ठाण्यात राधा गायकवाड बेपत्ता असल्याची नोंद होती. यावरून गेवराई पोलिसांनी जालना पोलिसांना संपर्क साधला. तिचे नातेवाईक गेवराई उपजिल्हा रूग्णालयात आले. त्यांनी साडी, कानातील व पैंजण या दागिन्यावरून ओळख पटवली होती. शवविच्छेदन व डीएनए करण्यासाठी मृतदेह अंबोजोईला रवाना करण्यात करण्यात आला होता.
या प्रकरणी राधा माणिक गायकवाड हिचा आत्याचा मुलगा सुभाष बापुराव शेरे विरुध्द ३०२ चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मृत राधा गायकवाडला एक मुलगा समर्थ व दोन मुली मोनिका व शीतल आहेत. मोनिकाचे लग्न झाले आहे. राधाचा नवरा दामोदर गायकवाडने ३ वर्षांपूर्वी आजारपणामुळे आत्महत्या केली होती. राधाच्या पतीचे निधन झाल्यापासून राधा ही आपल्या भावाच्या गावातच राहत होती. राधा हिला चार आत्या आहेत.
त्यापैकी एक अंबड तालुक्यातील हारतखेडा येथे आत्या कौसाबाई असते. तिला दोन मुले आहेत. त्यातील एक मुलगा सुभाष बापूराव शेरे हा जालना एमआयडीसी येथे ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करतो. राधाच्या पतीचे निधन झाल्यापासून सुभाष शेरे हा राधाच्या घरी कुठल्या ना कुठल्या कारणाने ये-जा करत असे.
राधाच्या भावाने सुभाष यास वारंवार येण्याची विचारपूस केली. परंतु, मी राधाच्या दिरास भेटण्यासाठी येत असतो, असा बहाणा करत असे. राधा ही अधूनमधून मोठी बहीण विजय माला हिच्या गावी सामनगाव येथे जात येत असे. राधाचा पती माणिक गायकवाड मयत झाल्यानंतर इन्शुरन्स व बचत गटाचे चार लाख रुपये राधाला मिळाले होते.
पैशांची माहिती सुभाष शेरे याला समजली. राधा हिच्याकडून शेती विकत घेण्यासाठी २ लाख ५० हजार रुपये उसने घेतले. परंतु, त्याच्याकडे पैसे परत मागितले असता तो देण्यास टाळाटाळ करत असे. त्यावेळी राधाने आपल्या भावाला आणि कुटुंबियांना सांगितले होते की, सुभाषकडे पैसे मागितले तर तो जीवे मारण्याच्या धमक्या देतो.
दिनांक २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास राधा ही मोठी बहीण विजयमाला चिरकेकडे सामनगाव येथे गेली होती. दुसऱ्या दिवशी मुक्कामी थांबून ती दि. २ सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता परत येण्यास निघाली. सामनगाव गावापासून जवळ असलेल्या रिक्षा पॉईंट अंतरवाली फाटा येथे ती गेली होती.
पण, दुपारी दोनच्या सुमारास राधा ही घरी परत आली नाही. त्यामुळे राधाच्या मुलीने आपल्या मामाला सांगितले. त्यानंतर कुटुंबियांनी विजयमालाच्या गावी सामनगाव येथे जाऊन विचारपूस केली. तेव्हा राधा ही सकाळी ८ वाजता निघून गेल्याचे समजले.
दरम्यान, २१ सप्टेंबर रोजी राधा ही तिच्या बहिणीकडे येण्यापूर्वीच सुभाष शेरे हा राधाच्या दारात येऊन इकडे तिकडे पाहून निघून गेला होता. असे शेजाऱ्यांनी सांगितले. त्याच्यावर संशय आल्याने सुभाष शेरे याची चौकशी केली. तोदेखील राधा बेपत्ता झाल्यापासून घरी नसल्याचे समजले. दोघांचाही फोन बंद येत होता.
राधाची बहीण विजयमाला चिरके हिने २४ सप्टेंबर रोजी राधा बेपत्ता झाल्याची तक्रार जालना पोलिसात दिली होती. २ ऑक्टोबर रोजी जालना पोलिसांचा राधाच्या भावाला फोन आला. गेवराई तालुक्यातील रांजणी येथे एका महिलेचा मृतदेह सापडला असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर गेवराई येथे त्या सांगड्याची पाहणी केली.
कपड्यांची, दागिन्यांची पाहणी केली असता सदरचे कपडे व दागिने हे राधाचे असल्याची खात्री झाली. त्यानंतर तिचा मृतदेह गेवराई पोलिसांमार्फत पंचनामा करण्यात आला. पुढील कारवाईसाठी आंबेजोगाई येथे मृतदेह पाठविण्यात आला.
राधाचा भाऊ प्रकाश देविदास दुनगहू याने फिर्याद दिली. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सुभाष बापूराव शेरे याने मयत राधा हिचे अपहरण केले. दि.२ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान कधीतरी तिचा घातपात केल. तिला जीवे ठार मारून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्या उद्देशाने तिचा मृतदेह गेवराई तालुक्यातील रांजणी गावाजवळ NH52 हायवे रोडच्या बाजूला असलेल्या नाल्यामध्ये फेकून दिला. गेवराई पोलिस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम 302 365 व 201 नुसार दि. ६ रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेदेखील वाचा-