पुढारी ऑनलाईन डेस्क : आगामी टी 20 (T20) वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारताच्या टी 20 (T20) संघात मोठे बदल पाहायला मिळू शकतात. एका वृत्तानुसार, विराट कोहली (virat kohli) आणि रवींद्र जडेजा (ravindra jadeja) सारख्या खेळाडूंना टी 20 संघातून वगळले जाऊ शकते. तसेच त्यांच्या जागी नवीन खेळाडूंना संधी दिली मिळण्याची शक्यता आहे.
बीसीसीआय (BCCI)च्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वीही असे प्रकार घडत आले आहेत. त्याने यासाठी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे उदाहरण दिले. टी-20 विश्वचषकानंतर शमीला टी 20 फॉरमॅटमधून कसे वगळण्यात आले याबाबत या अधिका-याने सांगितले.
इनसाइड स्पोर्ट्सशी विशेष संवाद साधताना बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'यात नवीन काहीही नाही. प्रत्येक मोठ्या मालिका, स्पर्धेनंतर संक्रमणाचा काळ येतो. मोहम्मद शमीला गेल्या वर्षीच्या वर्ल्ड कपनंतर क्रिकेटच्या दोन फॉरमॅटमधून वगळण्यात आले होते.
विराट कोहली आता तरुण होणार नाही. भारतीय संघ ज्या प्रकारे बरेच सामने खेळतो ते पाहता आम्हाला कोहलीला चांगलेच सांभाळावे लागेल. रवींद्र जडेजाबद्दल बोलायचे झाले तर तो दुखापतीने त्रस्त आहे. सामन्यादरम्यान तो अनेकदा जायबंदी होतो. या कारणास्तव त्याच्याकडील वर्कलोड मॅनेज करणे गरजेचे आहे. काळानुसार संघात बदल आवश्यक असतात. वर्ल्ड कपनंतर, आम्ही संक्रमण कालावधीवर चर्चा करू आणि जर सर्वकाही योजनेनुसार झाले, तर कोहली आणि जडेजा यांना दोनच फॉरमॅटमध्ये खेळवले जाऊ शकते', असा त्यांनी खुलासा केला.
दरम्यान, सोमवारी (दि. 12) सायंकाळी बीसीसीआयने ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणा-या टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा केली. याचबरोबर भारताच्या दौ-यावर येणा-या ऑस्ट्रेलिया आणि द. आफ्रिके विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला आहे. आशिया कपमध्ये खेळलेल्या संघातील काही सदस्यांना वगळण्यात आले आहे. त्याचबरोबर काही दिग्गज खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे. आणखी एक खास गोष्ट म्हणजे मोहम्मद शमीला स्टँडबायवर ठेवण्यात आले आहे, मुख्य संघात त्याचा समावेश नाही.
दुसरीकडे संजू सॅमसनला या संघात स्थान मिळाले नाही. तर श्रेयस अय्यरला स्टँडबाय घेण्यात आले आहे. अशा स्थितीत पुन्हा एकदा निवडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. सॅमसनचे चाहते ट्विटरवर संतापले आहेत. सॅमसनचा समावेश न केल्याबद्दल चाहत्यांनी बीसीसीआयवर निशाणा साधत सडकून टीका केली आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
स्टँडबाय खेळाडू : मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.
गुडघ्याच्या शस्त्रक्रियेमुळे रवींद्र जडेजा वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे. त्याच्याशिवाय आशिया कपमध्ये महागडा ठरलेला आवेश खानलाही संघात स्थान मिळाले नाही. जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेलचे पुनरागमन झाले आहे. याशिवाय रवी बिश्नोई आणि दीपक चहर यांना स्टँडबायमध्ये ठेवण्यात आले आहे. अशा प्रकारे टीम इंडियामध्ये काही महत्त्वाचे आणि मोठे बदल पाहायला मिळाले आहेत.
संजू सॅमसनला या संघात स्थान मिळू शकले नाही. त्यांच्या नावाचा समावेश होईल अशी शक्यता वर्तवली जात होती पण तसे झाले नाही. दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत यांच्या रूपाने दोन यष्टिरक्षक निवडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फिरकी विभागासाठी अक्षर पटेल, अश्विन आणि चहल यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान, T20 वर्ल्ड कप व्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मायदेशातील T20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेनंतर दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका होणार आहे. दोन्ही संघ भारत दौऱ्यावर येणार आहेत.
खास बाब म्हणजे मोहम्मद शमीचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय दीपक चहरलाही संधी देण्यात आली आहे, मात्र दोघांनाही टी-20 विश्वचषकासाठी स्टँडबायवर ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे हार्दिक पांड्या आणि भुवनेश्वर कुमार यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. या दोन्ही खेळाडूंचा टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या संघात समावेश करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेनंतर टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कप खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला जाणार आहे.