उंडवडी; पुढारी वृत्तसेवा : शिर्सुफळ (ता. बारामती) येथील शिरसाई देवीच्या मंदिरात शनिवारी (दि.८) रात्री साडेबाराच्यादरम्यान मोठी चोरी झाली आहे. मंदिराच्या गेटला असलेले कुलुप तोडून चोरट्यांनी मंदिरातील देवीच्या सोन्या-चांदिच्या दागिन्यांसह २० किलोचा पितळी सिंह, पितळी समया, स्पिकर मशीन, पंचारती धुपआरती व इतर सामान असा जवळपास तीन लाखांपर्यंत ऐवज चोरीला गेला असल्याची माहिती मिळाली. (Baramati shirsai temple)
शिरसाई मंदिरात काकड आरती चालू असल्याने पहाटे साडेचार वाजता मंदिरातील पुजारी व गावकरी मंदिरात गेले असता चोरी झाल्याचे उघडकीस आले.
मंदिरातील मेन गेटचा दरवाजा न तोडता ओढ्या बाजूच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला व तीन दरवाजांचे कुलूप तोडून देवीच्या गाभा-यात प्रवेश करत चोरट्यांनी चोरी केली.
बारामती येथील पोलिसांनी पंचनामा करुन मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरु केले आहे. यात एक महिला व दोन पुरुष असल्याचे माहिती मंदिरातील पुजारी संजय गुरव, सरपंच आप्पासाहेब आटोळे व ग्रामस्थांनी दिली.
बारामती तालुक्यातील जागृत देवस्थान आसलेले शिर्सुफळ येथील शिरसाई मंदिरात चोरी झाल्याच्या घटनेने ग्रामस्थांत मोठी अस्वस्थता पसरली आहे. लवकरात लवकर चोरटे पकडावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. संपूर्ण गांव बंद ठेवून चोरीच्या घटनेचा गावकऱ्यांनी निषेध केला आहे. सध्या चोरीच्या घटनांत वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असले तरी गावागावात गस्त घालण्याची गरज असल्याचे मतही सरपंच आप्पासाहेब आटोळे यांनी व्यक्त केले आहे.