बच्चू कडू,www.pudhari.news 
Latest

Bachu Kadu : मराठी भूमित जो जन्माला आला तो खरा ‘मराठा’

गणेश सोनवणे

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा 

स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या महापुरुषांच्या नावाने आज देशात व राज्यात गलीच्छ राजकारण सुरु आहे. आज प्रत्येक जण एकमेकांकडे माणूस म्हणून न बघता हा त्या जातीचा तो त्या धर्माचा म्हणून एकमेकांना हिणवत आहे. हे पाहून त्या महापुरुषांना देखील वाईट वाटत असेल. एखादया रंगाचा झेंडा लावला की तो आमुक धर्माचा, एखाद्या महापुरुषाचा फोटो लावला की तो आमुक जातीचा असे संबोधले जात आहे. लोकांनी महापुरुषांना जातीत वाटून ठेवल्याचे दु:ख वाटते. मराठी भूमित जो जन्माला आला तो खरा 'मराठा' असल्याचे प्रतिपादन प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार ओमप्रकाश (बच्चू) कडू यांनी केले.

चांदवड शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ऐतिहासिक रंगमहाल वाड्यात मल्हारराव होळकर यांचा जन्मोत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. त्यावेळी माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक मविप्र समाज संस्थेचे तालुका संचालक डॉ. सयाजीराव गायकवाड होते. यावेळी चांदवड कृऊबा चे माजी सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, इतिहासकार लक्ष्मण नजान, प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश निंबाळकर, संस्थांचे व्यवस्थापक सुभाष पवार, विक्रम मार्तंड, विलासराव ढोमसे, आर. डी. थोरात, डॉ. उमेश काळे, अशोक व्यवहारे, समाधान बागल आदीसह मान्यवर उपस्थित होते.

बच्चू कडू पुढे म्हणाले, मल्हारराव होळकरांनी सती जाण्याची परंपरा मोडीत काढत पुण्यश्लोक अहिल्यादेवींना राष्ट्रासाठी लढण्यास प्रेरणा, उभारी, बळ दिले. यामुळे संपूर्ण देशात अहिल्यादेवी होळकरांनी विजय पताका फडकवीत अटकेपार झेंडा रोवला. यावेळी अहिल्यादेवींनी जात, धर्म, पंथ न बघता सर्वाना एकत्र घेत शत्रूंवर विजय मिळवीत संपूर्ण देशात डंका मिळविला. आज मतांच्या राजकारणासाठी राजकीय नेते माणसा- माणसात फुट पाडीत स्वतःचा स्वार्थ साधीत आहे. या राजकीय मंडळींच्या भूलथापांची सर्वसामान्य नागरिकांना देखील भुरळ पडली आहे. आज व्यक्तिगत स्वार्थ वाढला आहे. यामुळे एकमेकांमध्ये द्वेष, राग, चीड, संताप वाढत चालला आहे. हे देशासाठी घातक असल्याचे मत आ. कडू यांनी यावेळी मांडले.

यावेळी इतिहासकार लक्ष्मण नजान यांनी होळकर कालीन विजगाथा, पराक्रमावर प्रकाशझोत टाकला. गणेश निंबाळकर, भूषण कासलीवाल, आर. डी. थोरात, समाधान बागल यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास सूरळीकर यांनी केले.

कार्यक्रमास सचिन निकम, प्रकाश चव्हाण, रेवण गांगुर्डे, शैलेश ठाकरे, अनिल पाटील, राम बोरसे, दत्तात्रय बोडके, स्वाती गजभार, शिवाजी ढेपले, विनायक काळदाते, देविदास चौधरी, शरद शिंदे, भाऊसाहेब राजोळे, खंडेराव पाटील, सुरेश उशीर, दत्तात्रय बारगळ, गणपत कांदळकर, दत्तात्रय वैद्य, दत्तू देवरे, संगीता पाटील आदीसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

रंगमहालाचे रुपडे बदलणार 

चांदवडच्या ऐतिहासिक रंगमहाल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या विजय गाथा सांगणारे प्रतिक आहे. हे प्रतिक नागरिकांनी प्रत्यक्ष अनुभवणे आवश्यक आहे. यासाठी येत्या ५ एप्रिलला मंत्र्यालयातील पर्यटन विभागात जाऊन रंगमहालाच्या विकास कामाबाबत दिरंगाई का होत आहे यांची माहिती घेतो. तसेच बंद असलेले कामकाज त्वरित सुरु करून हा रंगमहाल पर्यटनासाठी खुला केला जाईल. येत्या वर्षभरात रंगमहालाचे रुपडे नक्कीच बदललेले प्रत्येकाला दिसेल. पुढच्या वर्षी मल्हारराव होळकरांची जयंती अधिक जोमाने साजरी करण्याचे आश्वासन आ. बच्चू कडू यांनी उपस्थिताना दिले.

होळकरकालीन शस्त्र साठ्याचा लुटला आनंद 

यावेळी अहिल्यादेवी होळकरांनी युद्ध काळात वापरलेले ढाल, तलवार, चिलखत, दांड पट्टे, भाले, वाघ नखे, कुऱ्हाडी यांचे प्रदर्शन व प्रात्यक्षिक इतिहासकार, वक्ते, अभ्यासक आनंद ठाकूर यांनी भरवले होते. हे प्रदर्शन पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT