इंदौर ; पुढारी ऑनलाईन : मध्य प्रदेशमधील रतलाम जिल्ह्यातील एका महिलेने अनोख्या मुलाला जन्म दिला आहे. या मुलाला जन्मत: दोन डोके, तीन हात असल्याचे आढळले आहे. दरम्यान, त्या बाळाला पुढील उपचारासाठी इंदौरला पाठवण्यात आले आहे. (Madhya Pradesh)
जावरा येथील रहिवासी असलेल्या शाहीनने दोन डोकी आणि तीन हात असलेल्या मुलाला जन्म दिला. दरम्यान, त्या बाळाचा तिसरा हात दोन चेहऱ्यांच्या पाठीमागे आहे. त्या बाळाला काही काळ रतलामच्या एसएनसीयूमध्ये ठेवण्यात आले आणि तेथून इंदूरच्या एमवाय हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
सोनोग्राफीमध्ये हे बाळ जुळे असल्याचे दिसत होते. एसएनसीयूचे प्रभारी डॉ. नावेद कुरेशी यांनी सांगितले की, मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. अशा परिस्थितीत, अनेक मुले एकतर गर्भात किंवा जन्माच्या ४८ तासांच्या आत मरतात. यावर शस्त्रक्रियेचा पर्याय असला तरी. मात्र, अशी ६० ते ७० टक्के मुले जगत नाहीत. (Madhya Pradesh)
सध्या मुलाला इंदूरच्या एमवाय हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे, तर आईला रतलाम हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहे. बाळाला डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.