पुढारी ऑनलाईन डेस्क : इंग्लंड आणि पाकिस्तान रविवारी टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भिडतील. या सामन्यासाठी पाकिस्तानचा कर्णधार बाबर (Babar Azam) खूप उत्सुक आहे. या हायव्होल्टेज सामन्याचे आपल्यावर कोणतेही दडपण नसल्याचे बाबरने सांगितले आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड रविवारी (दि. १३ नोव्हेंबर) टी-२० विश्वचषकाच्या विजेतेपदाच्या लढतीमध्ये आमनेसामने येणार आहेत. हा अंतिम सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळवण्यात येणार आहे. यावेळी दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना अपेक्षित आहे.
बाबर आझमने (Babar Azam) फायनलच्या एक दिवस आधी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, 'आम्ही फायनलबद्दल घाबरलेले नसून उत्साही आहोत. इंग्लंड हा एक चांगला संघ आहे आणि आम्ही त्यांच्याविरुद्ध नुकतीच स्पर्धात्मक मालिका खेळली. आम्हाला चांगल्या लयीत अंतिम फेरीत खेळायचे आहे. टी-२० विश्वचषकापूर्वी पाकिस्तानने घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध ७ सामन्यांची टी-२० मालिका खेळली होती. ही मालिका इंग्लंडने ४-३ अशी जिंकली.
पाकिस्तानने न्यूझीलंडचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला, तर इंग्लंडने भारताचा १० गडी राखून पराभव करून विजेतेपदाच्या सामन्यात प्रवेश केला. फायनलमध्ये पॉवरप्लेमध्ये दोन्ही संघांसाठी धावा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बाबर म्हणाला, सामन्यामध्ये पॉवरप्ले महत्त्वाचा असेल. सलामीवीर फलंदाजांनी चांगली सुरूवात केल्यास त्याचा आम्हाला नक्कीच फायदा होईल.
पाकिस्तानच्या मधल्या फळीला सुरुवातीच्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. मधल्या फळीतील फलंदाजीबद्दल बाबर म्हणाला, मध्यक्रमाने आता पुढे येऊन आपली जबाबदारी समजून घेतल्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे. जेव्हा तुम्ही कर्णधार म्हणून कामगिरी करत नाही तेव्हा तुमच्यावर दबाव निर्माण होतो.
हेही वाचा;