खेड- शिवापूर : पुढारी वृत्तसेवा : आषाढी एकादशी व बकरी ईद एकाच दिवशी असून, सामाजिक एकोपा राखण्याच्या हेतूने खेड-शिवापूरमध्ये (ता. हवेली) आषाढी एकादशीदिवशी बकरी ईदची कुर्बानी द्यायची नाही, तर कुर्बानीचा कार्यक्रम शुक्रवारी (दि. 30) होणार असल्याचा निर्णय मुस्लिम समाजाचे शिष्टमंडळाने दिला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांच्या नेतृत्वाखाली सरपंच स्वप्नील जगताप, माजी सरपंच अमोल कोंडे, उपसरपंच राजेंद्र कोंडे तसेच मुस्लिम समाजाचे शिष्टमंडळ यांची बैठक पार पडली. या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला.
हिंदू-मुस्लिम समाजाचे एकतेचे प्रतीक असलेला खेड-शिवापूर येथील पीर कमरअली दुर्वेश बाबांच्या दर्ग्यात बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मात्र, येथील हिंदू-मुस्लिम समाजाच्या एकतेच्या चर्चा अवघ्या महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे आषाढी एकादशी दिवशी मुस्लिम समाजाने कुर्बानी न देण्याचा निर्णय घेतला आहे. कोणताही हिंदू सण असला, तरी मुस्लिम समाजाकडून पुरण-पोळीचा स्वयंपाक केला जातो, तर रमजान किंवा बकरी ईद असल्यास गावातील प्रत्येकजण मलिदा घेऊन दर्ग्यावर नैवेद्य अर्पण करतात. एका बाजूला अजान, तर दुसर्या बाजूला भजन असा संगम फक्त खेड-शिवापूरमध्येच पाहायला मिळतो. त्यामुळे हा पीर कमरअली दुर्वेश बाबांचा दर्गा म्हणजे हिंदू-मुस्लिम समाजाच्या एकतेचे प्रतीक आहे, असे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, सरपंच स्वप्नील जगताप व माजी सरपंच अमोल कोंडे यांनी सांगितले.
हे ही वाचा :