पुणे : पुढारी वृत्तसेवा
पुण्याची ओळख दुचाकींच्या शहराबरोबरच आता बेदरकारपणे वाहन चालविणारांचे शहर तसेच अपघाताचे शहर म्हणून होत आहे. पुण्यातील शहराच्या हद्दीत दिवसाला दोनहून अधिक अपघात होत असून, यात सरासरी एका नागरिकाला जीव गमवावा लागत आहे.
तीन महिन्यांच्या कालावधीत शहराच्या हद्दीत 28 मार्चअखेर तब्बल 167 अपघात घडले. त्यामध्ये 78 नागरिकांना अपघातामध्ये आपला जीव गमवावा लागला. यातील 77 अपघात जीवेघेणे होते, 83 अपघातांमध्ये 92 जणांना गंभीर जखमी केले. पाच अपघातांमध्ये 25 जण किरकोळ जखमी झाले. शहरातील 19 'स्पॉट' हे नागरिकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. या ठिकाणी वारंवार अपघात घडत आहेत.
2021 मध्ये 741 अपघात झाले असून, वाहतूक विभागाकडून वर्गवारी करण्यात आली आहे. 239 प्राणांतिक अपघातात 255 जणांचा मृत्यू झाला. 391 गंभीर अपघातांमध्ये 457 नागरिक गंभीर जखमी झाले. 72 किरकोळ अपघातात 99 जखमी झाले. 39 अपघात विनादुखापत झाले.
सिंहगड वाहतूक विभागाच्या हद्दीत 45 अपघात झाले. त्यामध्ये नवीन कात्रज बोगदा 9, दरीपूल 11, नवले पूल 16, भूमकर ब्रिज 9 अशा ठिकाणांचा समावेश आहे. सिंहगड रोड वाहतूक विभागाच्या पाठोपाठ हडपसर वाहतूक विभागाच्या हद्दीत तब्बल 41 अपघात झाले. त्यामध्ये वैदुवाडी चौकात 15, फुरसुंगी फाटा चौक 9, फुरसुंगी रेल्वे ब्रिज 11, आयबीएम कंपनीजवळ सासवड रस्त्यावर 7 असे अपघात घडले आहेत. वारजे वाहतूक विभागाच्या हद्दीत येणारे तीन स्पॉट नागरिकांसाठी जीवघेणे ठरताना दिसत आहेत. हद्दीत 2020 मध्ये 34 अपघात घडले. त्यामध्ये मुठा नदीपूल 6, डुक्करखिंड 11, माई मंगेशकर हॉस्पिटलजवळ 17 अपघात घडले आहेत.
विमानतळ वाहतूक विभागाच्या हद्दीतील पाच स्पॉटवर वारंवार अपघात होताना दिसत आहेत. या ठिकाणी तब्बल 32 अपघात झाले आहेत. त्यामध्ये टाटा गार्डरूम 6, खराडी बायपास चौक 10, थिटेवस्ती येथील एचपी पेट्रोल पंपासमोर आणि साईनाथ चौकासमोर प्रत्येकी 5 अपघात, तर पठाण शहर दर्ग्यासमोर सहा अपघात झाले. भारती विद्यापीठ वाहतूक विभागाच्या हद्दीत कात्रज चौक या एका स्पॉटवर सर्वाधिक 22 अपघात झाल्याचे आढळून आले आहे. त्याबरोबरच मुंढवा वाहतूक विभागाच्या हद्दीत मुंढवा रेल्वे ब्रिजवर 12 अपघात झाले. कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खडी मशिन चौकात 7 अपघात झाले आहेत.
वाहनचालकांच्या बेदरकारपणे वाहन चालविण्यामुळे, चुकांमुळे अपघात घडत आहेत. त्यामुळे वाहन चालविताना नागरिकांनीही काळजी घेण्याची गरज आहे. दुचाकीवर वाहतूक करताना हेल्मेट घातले पाहिजे. वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत.
– राहुल श्रीरामे, पोलिस उपायुक्त, वाहतूक विभाग पुणे.