Latest

Australian Open : जगातील अव्वल टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचला मोठा धक्का, ऑस्ट्रेलियानं प्रवेश नाकारला!

दीपक दि. भांदिगरे

मेलबर्न : पुढारी ऑनलाईन

Australian Open : जगातील अव्वल टेनिसपटू आणि २० ग्रँडस्लॅम जिंकणारा नोव्हाक जोकोव्हिच (Novak Djokovic) यावेळी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा खेळण्याची शक्यता कमी आहे. जोकोव्हिचला व्हिसा अर्जात केलेली एक चूक महागात पडली आहे. त्यासाठी त्याला ऑस्ट्रेलियात प्रवेश नाकारण्यात आला. ऑस्ट्रेलियाने त्याला व्हिसा नाकारला आहे. पण जोकोव्हिचने ऑस्ट्रेलियाने त्याचा व्हिसा रद्द करण्याला कायदेशीर आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे.

सिडनी मॉर्निंग हेराल्डमधील एका वृत्तानुसार, जोकोव्हिचला मेलबर्न विमानतळावर (Melbourne Airport) आठ तास ताटकळत घालवावे लागले. त्याने ऑस्ट्रेलियामध्ये प्रवेश करण्यासाठी योग्य कायदेशीर प्रक्रिया पार पडली नसल्याचे ऑस्ट्रेलियन बॉर्डर फोर्सचे म्हणणे आहे. यामुळे गेल्या वर्षीच्या ऑस्ट्रेलियन ओपन विजेत्याला गुरुवारी मेलबर्न सोडण्याचे आदेश दिले जाण्याची शक्यता आहे.
मार्गदर्शक तत्त्वांनुसार, COVID-19 प्रतिबंधक लसीकरण न केलेल्या लोकांनी देशाच्या सीमेवर पुरावे सादर करणे आवश्यक आहे. याच आधारे ऑस्ट्रेलियाने जगातील अव्वल टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचचा व्हिसा रद्द केला, असे ऑस्ट्रेलियाचे आरोग्यमंत्री ग्रेग हंट यांनी स्पष्ट केले आहे.

जोकोव्हिचमुळे (Novak Djokovic) ऑस्ट्रेलियात वाद निर्माण झाला आहे. ऑस्ट्रेलियात आणि ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेसाठी (Australian Open) येणाऱ्या सर्वांना कोविड लसीकरणाचे आवश्यक डोस घेणे सक्तीचे करण्यात आले आहे. पण जोकोव्हिचला कोविड लसीकरणाच्या या नियमातून सूट देण्यात आली होती. जोकोव्हिचला कोणत्या आधारावर सूट देण्यात आली, असा सवाल ऑस्ट्रेलियातील लोकांनी उपस्थित करत सरकारच्या निर्णयाला जोरदार विरोध केला आहे. याच दरम्यान ५ जानेवारी रोजी जोकोव्हिचचे मेलबर्न विमानतळावर आगमन झाले होते. पण त्याला विमानतळाबाहेर जाण्यासाठी परवानगी देण्यात आली नाही. कारण त्याने व्हिसा अर्जावर चूक केली होती.

ऑस्ट्रेलिया मीडियातील वृत्तानुसार, जोकोव्हिचने व्हिसाच्या ज्या कॅटेगरीमधून अर्ज केला होता; त्यात कोविड लसीकरणाबाबत सूट देण्याची तरतूद नाही. जोकोव्हिचची ही चूक ऑस्ट्रेलियन बॉर्डर फोर्सने निदर्शनास आणून दिली. जोकोव्हिचने २०२० मध्ये लसीकरणाला विरोध केला होता. यामुळे त्याने स्वतः लस घेतली नसल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलिया ओपन आयोजकांनी मंगळवारी जारी केलेल्या निवेदनातून जोकोव्हिचला स्पर्धेत भाग घेण्यासाठी वैद्यकीय सूट देण्यात आल्याचे जाहीर केले होते. जोकोव्हिचने वैद्यकीय सूट मिळण्याबाबत जो अर्ज केला आहे तो मिळाला आहे. आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतर हा निर्णय घेतला असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले होते. ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धा १७ जानेवारी पासून सुरु होत आहे.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT