मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र एटीएसने गुरुवारी (दि.२२) पहाटे राज्यभरात छापेमारी केली. त्यात मालेगावातूनही एकाला ताब्यात घेण्यात आले असून, तो पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा शहराध्यक्ष असल्याचे चर्चेत आहे. मात्र, अधिकृतरित्या कोणतीच माहिती पुढे आलेली नाही.
एटीएसने गुरुवारी पहाटेपासून मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, बीड, परभणी, नांदेड, जळगाव, जालना आणि मालेगावात छापेमारी केल्याने एकच खळबळ उडाली. या कारवाईत काही संशयितांना अटक झाल्याचे माध्यमात झळकले. विशेषतः पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) या वादग्रस्त संघटनेच्या सक्रीय पदाधिकाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले जात असल्याचे सांगण्यात येते. स्थानिक सूत्रांकडून घेतलेल्या माहितीनुसार, मालेगाव पीएफआयचा अध्यक्ष याला सकाळी पथकाने ताब्यात घेतले. याविषयी स्थानिक यंत्रणेला दूर ठेवण्यात आल्याने त्याकडून अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.