Latest

Asian Under-20 Athletics : आशियाई अंडर-20 अ‍ॅथलेटिक्स; 19 पदकांसह भारताचा तिसरा क्रमांक

Shambhuraj Pachindre

इंचियोन; वृत्तसंस्था : दक्षिण कोरियातील इंचियोन येथे झालेल्या आशियाई अंडर-20 अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये बुधवारी शेवटच्या दिवशी भारताने आणखी दोन सुवर्णपदकाची भर टाकत यामुळे भारताने पदक तालिकेत तिसर्‍या स्थानासह स्पर्धेचा निरोप घेतला. 45 सदस्यीय भारतीय संघाने, 19 महिला खेळाडूंसह 4 ते 7 जूनदरम्यान वयोगटातील एशियन ट्रॅक आणि फील्ड स्पर्धेत भाग घेतला. (Asian Under-20 Athletics)

स्पर्धेच्या समारोपाच्या दिवशी, लक्षिता विनोद संदिलाने महिलांच्या 1500 मीटर धावण्याच्या शर्यतीत विजय मिळवला, तर महिलांच्या 4 बाय 400 मीटर रिलेमध्येही सुवर्णपदक जिंकल्याने भारताच्या पदकांची संख्या 19 झाली. यामध्ये सहा सुवर्ण, सात रौप्य आणि सहा कांस्यपदकांचा समावेश आहे. 23 पदकांसह जपान (14 सुवर्ण, चार रौप्य आणि पाच कांस्य) अव्वल स्थानावर आहे, तर चीन 11 सुवर्ण, पाच रौप्य आणि तीन कांस्य पदकांसह 19 पदकांसह दुसर्‍या स्थानावर आहे. (Asian Under-20 Athletics)

बुधवारी लक्षिता विनोद संदिला हिने महिलांच्या 1500 मीटर शर्यतीत 4:24.23 सेकंदांचा वेळ नोंदवत भारतासाठी पाचवे सुवर्ण जिंकले. दिवसाच्या उत्तरार्धात, भारताची भरवशाची 400 मीटर धावपटू रेझोआना मल्लिक हिना हिने लांब महिला रिले संघात (4 बाय 400 मीटर) सुवर्णपदक मिळवले. भारतीय संघाने 3:40.49 सेकंद अशी वेळ नोंदवली. कझाकिस्तानने 3:46.19 सेकंद वेळेसह रौप्य, तर कोरियाने 3:47.46 सेकंदांसह कांस्यपदक जिंकले. पुरुषांच्या 4 बाय 400 मीटर रिले संघाला 3:08.78 सेकंद वेळेसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

पुरुषांच्या 5000 मीटर शर्यतीत भारताच्या शिवाजी परशु मदाप्पागौद्राने 14:49.05 सेकंद वेळेसह रौप्यपदक जिंकले. कोरियन किम ताहेहुनने 14:49.55 सेकंद वेळेसह कांस्यपदक जिंकले, तर जपानच्या सोनाटा नागाशिमाने 14:23.91 सेकंदांसह सुवर्णपदक जिंकले.

भारताच्या मेहदी हसनने पुरुषांच्या 1500 मीटरमध्ये कांस्यपदक जिंकले. त्याची वेळ 3:56.01 सेकंद होती. पण भारतीय लांब उडीपटू रजतचे कांस्यपदक थोडक्यात हुकले. त्याची सर्वोत्कृष्ट उडी 7.26 मीटर होती, तर चीनच्या होंगमिंग झांगने 7.34 मीटरच्या सर्वोत्तम उडीसह कांस्यपदक जिंकले.

महिलांच्या 200 मीटरमध्ये भारताच्या नयना कोकरेने 24.53 सेकंद वेळ नोंदवत चौथे स्थान पटकावले, तर उन्नती अयप्पा बोलंडने 24.96 सेकंदांसह आठवे स्थान पटकावले. भारतीय उंच उडीपटू अनिकेत माने मात्र स्पर्धेत लवकर बाहेर पडला. त्याचे तीनही प्रयत्न अयशस्वी झाले.

रिलेमध्ये सुवर्णपदकाला गवसणी

कसबा बावडा : दक्षिण कोरिया येथील इंचियोन येथे झालेल्या 20 वर्षांखालील आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 4 बाय 400 मीटर रिले स्पर्धेत भारतीय रिले संघाने 3:40.50 सेकंदाची वेळ नोंदवत सुवर्णपदकाला गवसणी घातली. या संघात महाराष्ट्राच्या रिया पाटील, अनुष्का कुंभार या दोघींसह कनिष्ता टीना (तामिळनाडू) व रेझोण्णा हिना (प. बंगाल) यांचा समावेश होता.

हेही वाचा;

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT