पुढारी ऑनलाईन डेस्क : चीनच्या हांगझोऊ येथे सुरू असलेल्या चौथ्या आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताने आपल्या मोहिमेची धमाकेदार सुरुवात केली आहे. आज दुसऱ्या दिवशी प्राची यादवने महिला KL2 कॅनोईमध्ये सुवर्णपदक जिंकले. आशियाई पॅरा गेम्स (AsianParaGames) मधील तिचे हे दुसरे पदक आहे. तर कौरव मनीषने पुरुषांच्या KL3 कॅनोई स्पर्धेत कास्य पदकावर नाव कोरले. या स्पर्धेत भारत सहा सुवर्णांसह चौथ्या स्थानावर असून चीन आघाडीवर आहे.
संबंधित बातम्या :
सोमवारी (दि. 23) भारतीय खेळाडूंनी सहा सुवर्ण, सहा रौप्य आणि पाच कांस्य पदकांसह १७ पदके जिंकली होती. प्राची यादवने भारताला पहिले पदक मिळवून दिले. तिने कॅनोई VL2 स्पर्धेत रौप्य पदकावर आपले नाव कोरले. त्यानंतर भारतीय खेळाडूंनी पदकांचा पाऊस पडला. आज दुसऱ्या दिवशीही भारताने वॉटर स्पोर्ट्समध्ये सुवर्ण सुरूवात केली आहे. कॅनोईमध्ये प्राची यादवने दुसरे सुवर्ण यश मिळवले, तर कौरव मनीषने कांस्य पदक पटकावले आहे.
सोमवारी पहिल्या दिवशी अॅथलेटिक्समध्ये प्रणव सूरमाने पुरुषांच्या क्लब थ्रो एफ ५१ स्पर्धेत तिन्ही पदके जिंकली. २९ वर्षीय सूरमाने आशियाई पॅरा गेम्सचा विक्रम मोडीत काढत ३०.०१ मीटर धावून सुवर्णपदक पटकावले तर धरमबीर (२८.७६ मीटर) आणि अमित कुमार (२६.९३ मीटर) अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.
महिलांच्या १०० मीटर टी १२ क्रीडा प्रकारात सिमरन हिने रौप्यपदक मिळवले आहे.
पुरुषांच्या उंच उडी T63 प्रकारातही तीन भारतीयांनी अव्वल तीनमध्ये स्थान मिळविले. या संपूर्ण स्पर्धेत केवळ तीन खेळाडूंचा समावेश होता जे भारतीय होते. त्यामुळे तिन्ही पदके जिंकण्यासाठी किमान चार खेळाडू मैदानात असणे आवश्यक आहे, या आशियाई पॅरालिम्पिक समितीच्या (APC) नियमांनुसार भारताला कांस्य पदक मिळू शकले नाही. या स्पर्धेत शैलेश कुमारने 1.82 मीटरच्या विक्रमी उडीसह सुवर्णपदकाची कमाई केली. तर मरियप्पन थांगावेलू (1.80 मीटर) याने रौप्य पदक जिंकले. गोविंदभाई रामसिंगभाई पडियार (1.78 मी) एपीसी नियमांनुसार कांस्य पदकापासून वंचित राहिला. थांगवेलूने यापूर्वी 2016 च्या रिओ पॅरालिम्पिकमध्ये उंच उडी T42 प्रकारात सुवर्णपदक आणि टोकियो पॅरालिम्पिकमध्ये T63 प्रकारात रौप्य पदक जिंकले होते.
हेही वाचा :