पुढारी ऑनलाईन डेस्क : Asia Cup Match Timings : आशिया चषक स्पर्धेची सुरुवात 30 ऑगस्टपासून होत आहे आणि त्याआधी या स्पर्धेच्या सामन्यांची वेळ काय असेल याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तान आणि श्रीलंकेत हायब्रीड मॉडेलवर खेळवल्या जाणार्या या स्पर्धेच्या ब्रॉडकास्टर कंपनीने सामन्यांची वेळ सारखीच असेल असे उघड केले आहे. यापूर्वी तीन वेगवेगळ्या वेळांना सामने सुरू होण्याची शक्यता होती, परंतु आता नवीन वेळा समोर आल्या आहेत.
यावेळची आशिया चषक स्पर्धा ही एकदिवसीय स्वरूपात खेळवली जाणार असून स्पर्धेचे ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्सने सामन्यांच्या वेळा निश्चित केले असून स्पर्धेचे सर्व 13 सामने श्रीलंकेच्या वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरू होतील. भारत आणि श्रीलंका हे दोन्ही देश एकाच टाइमझोनमध्ये येतात त्यामुळे भारतातील चाहत्यांना टेलिव्हिजनवर 3 वाजल्यापासून सामने पहायला मिळणार आहेत. (Asia Cup Match Timings)
आशिया कपमध्ये भारतीय संघाचा पहिला सामना 2 सप्टेंबर रोजी पाकिस्तानशी होणार आहे, तर दुसरा साखळी सामना 4 सप्टेंबर रोजी नेपाळशी होणार आहे. भारताचे दोन्ही साखळी सामने श्रीलंकेतील कँडी येथे खेळवले जाणार आहेत. हे दोन्ही सामने किंवा त्यातील एक सामना चांगल्या फरकाने जिंकल्यास टीम इंडिया सुपर 4 फेरीत जाईल. त्यानंतर भारतीय संघाला 10, 12 आणि 15 सप्टेंबर रोजी सामने खेळावे लागतील. यादरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुसरी लढत 10 सप्टेंबरला होऊ शकते. (Asia Cup Match Timings)