महाडच्या वरदविनायक मंदिरातील मूर्ती स्वयंभू आहे. ही मूर्ती १६९० साली मंदिराजवळील तळ्यात सापडली. मूर्ती पूर्वाभिमुख आहे. या मंदिराच्या चारही दिशांना चार हत्तींची स्थापना केली आहे. या मंदिरात १८९२ पासून अखंड दीप प्रज्वलित आहे.
मंदिरात भाविकांना गर्भगृहात जाऊन पूजा-अर्चा करण्याची परवानगी आहे. इथे येणारे भाविक दुपारी बारापर्यंत स्वहस्ते गणपतीची पूजा करू शकतात. दुपारी बारा ते दोन या वेळेत प्रसाद वाटला जातो. गणेशचतुर्थी आणि माघ प्रतिपदा ते पंचमी (गणेश जयंती) या दिवसात उत्सव साजरा केला जातो. अंगारकी आणि संकष्टी चतुर्थी यादिवशी विशेष पूजा केली जाते. माघ महिन्यात येथे भाविकांची संख्या वाढते. वरदविनायक महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात खालापूर तालुक्यातील महाड येथे आहे. हे मंदिर महाराष्ट्रातील सगळ्या मोठ्या शहरांना रस्तामार्गे जोडलेले आहे.