Latest

Ashes 2023 : वॉर्नर ठरणार बळीचा बकरा? हेडिंग्ले कसोटी गमावल्यानंतर कमिन्स म्हणाला…

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : यजमान इंग्लंडने 2023 मधील अॅशेस मालिकेतील (Ashes 2023) तिसरा कसोटी सामना तीन गडी राखून जिंकला. या मालिकेत ऑस्ट्रेलिया अद्याप 2-1 ने पुढे आहे, पण आता चौथा कसोटी सामना पॅट कमिन्स (Pat Cummins) अँड कंपनीसाठी खूप महत्त्वाचा झाला आहे. जर ऑस्ट्रेलियाने चौथी कसोटी जिंकली तर 2001 नंतर प्रथमच इंग्लंडमधील अॅशेस मालिकेवर कब्जा करणे शक्य होईल. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने (david warner) तिसऱ्या कसोटीच्या दोन्ही डावात केवळ चार आणि एका धावांचे योगदान दिले, त्यानंतर त्याचे प्लेइंग इलेव्हनमधील स्थान धोक्यात आलेले आहे.

हेडिंग्ले कसोटी (headingley test) तीन विकेट्सने गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने जे काही सांगितले त्यावरून असे दिसते की मालिकेतील चौथ्या कसोटीत वॉर्नरला बळीचा बकरा बनवले जाऊ शकते. ॲशेस मालिकेतील (Ashes 2023) पुढील कसोटी सामना 19 जुलैपासून मँचेस्टरमध्ये खेळवला जाणार आहे. त्यामुळे 10 दिवस विश्रांती आणि सरावासाठी मिळणार आहेत. यादरम्यान पुढील कसोटीसाठीच्या संघाबाबत वेगळा विचार केला जाऊ शकतो, असे कमिन्सने म्हटले.

कमिन्स (Pat Cummins) म्हणाला की, 'तुम्हाला सर्व पर्याय खुले ठेवावे लागतील, आमच्याकडे आता 9 ते 10 दिवस आहेत, त्यामुळे आम्ही सध्या काही दिवस सुट्टी घेऊ. मात्र त्यानंतर सर्वांची तयारी सुरू होईल, कॅमेरून ग्रीन मँचेस्टर कसोटीपर्यंत तंदुरुस्त होईल आणि जोश हेझलवूडही पुनरागमन करेल असा विश्वास आहे. त्यामुळे आमच्याकडे ब-याच खेळाडूंचा पर्याय उपलब्ध असेल. मँचेस्टरची खेळपट्टी पाहूनच पाहावी सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनचा विचार करावा लागेल.'

मार्शने ॲशेस मालिकेतील (Ashes 2023) तिसऱ्या कसोटीत शतकी खेळी करण्याबरोबरच काही विकेटही घेतल्या. त्यामुळे त्याचे मँचेस्टर कसोटीतील स्थान निश्चित समजले जात आहे. दुसरीकडे कांगारूंचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने (david warner) सध्या सुरू असलेल्या ॲशेस मालिकेत आतापर्यंत तीन सामन्यांच्या सहा डावांत 23.50 च्या सरासरीने केवळ 141 धावा केल्या आहेत. निराशाजनक कामगिरीमुळे त्याचे पुढील दोन कसोटींसाठी संघातील स्थान धोक्यात आले आहे. वॉर्नरच्या बॅटमधून धावा येत नसल्याने संघासाठीही तो अडचणीचा वाटत आहे. त्यामुळे मँचेस्टर कसोटीत त्याला कट्ट्यावर बसवण्यात येईल अशी शक्यता आहे. दरम्यान, यापूर्वीच त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची आपली योजना आधीच बोलून दाखवली असून पुढील वर्षी जानेवारीमध्ये तो शेवटचा कसोटी सामना खेळेल असा अंदाज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT