अॅडलेड, पुढारी ऑनलाईन : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात धडाकेबाज जोस बटलरने (Jos Buttler) चाहत्यांची मने जिंकली. इंग्लंडचा यष्टिरक्षक बटलर त्याच्या शानदार झेलमुळे चर्चेत आहे. ॲशेस सिरीजच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने एका हाताने हवेत त्याच्यापासून ४ फूट दूर जाणारा चेंडू मोठी झेप घेत पकडला. बटलरने उजवीकडे झेपावत मार्कस हॅरिसचा अप्रतिम झेल टिपला. उजवीकडे झेप घेत असताना कोणत्याही यष्टिरक्षकाला झेल घेणे सोपे नसते. तेही गोळीच्या वेगाने चेंडू बाहेर आल्यावर. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
ॲशेस सिरीजमधील दुसरा कसोटी डे नाईट खेळवला जात आहे. सामन्यातील आठवे षटक स्टुअर्ट ब्रॉड टाकत होता. त्याचा सामना डावखुरा मार्कस हॅरिस करत होता. ब्रॉडने षटकातील तिसरा चेंडू राऊंड द विकेटवरून टाकला. हॅरिसच्या लेगसाईडला जात होता. या चेंडूवर हॅरिसने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू बॅटची कड घेऊन उजवीकडे गेला. चेंडू लेग स्लिप आणि यष्टीरक्षक यांच्यामधून जात होता, तेव्हा बटलरने (Jos Buttler) चपळाईने उजवीकडे झेपावत एका हाताने चेंडू त्याच्या ग्लोव्हज् मध्ये पकडला. हा एक अप्रतिम, शानदार असा झेल आहे. क्रिकेट सामन्यात असे सुरेख झेप क्वचितच पहायला मिळतात.
मार्कस हॅरिस २८ चेंडूत अवघ्या ३ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. पहिल्या कसोटी सामन्यातही मार्कसला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही आणि डावाच्या सुरुवातीलाच बाद होऊन तो पॅव्हेलियनमध्ये परतला होता. ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या ॲशेसमध्ये बटलर प्रथमच खेळत आहे. बटलरने (Jos Buttler) पकडलेल्या कॅचचे सोशल मीडियामध्ये कौतुक आहे आणि त्याला 'सुपरमॅन' म्हणून संबोधले आहेत.
अॅडलेडमध्ये खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्याचे नेतृत्व स्टीव्ह स्मिथ करत आहे. कारण नियमित कसोटी कर्णधार पॅट कमिन्सला कोरोना संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर या डे नाईट कसोटीतून वगळण्यात आले आहे. अॅडलेडमधील एका रेस्टॉरंटमध्ये तो कोविड-19 पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आला होता. 2018 नंतर स्मिथ कसोटी संघाचे नेतृत्व करत आहे. 2018 मध्ये जेव्हा बॉल टॅम्परिंगची घटना घडली तेव्हा केपटाऊन कसोटीत त्याने कांगारू संघाचे अखेरचे नेतृत्व केले होते. ज्यामध्ये डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्ट यांना एका वर्षासाठी निलंबित करण्यात आले होते.
दरम्यान, आज (दि. १६) ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ब्रिस्बेन येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ९ विकेट्सने पराभव केला होता.
डेव्हिड वॉर्नर, मार्कस हॅरिस, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मायकेल नेसर, मिचेल स्टार्क, झ्ये रिचर्डसन, नॅथन लियॉन.
रॉरी बर्न्स, हसीब हमीद, डेव्हिड मलान, जो रूट (कर्णधार), बेन स्टोक्स, ऑली पोप, जोस बटलर (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, ऑली रॉबिन्सन, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन.