केंद्र सरकारच्या सेवेत असलेल्या सर्व अराजपत्रित कर्मचार्यांना अॅडहॉक तत्वावर 30 दिवसांच्या वेतनाइतका दिवाळी बोनस ( Diwali bonus ) अर्थ मंत्रालयाने जाहीर केला आहे. केंद्र सरकारच्या बी आणि सी ग्रुपअंतर्गत येणार्या सर्व कर्मचार्यांना ज्यात निमलष्करी दलातील सैनिकांचाही समावेश आहे, अशांना गैरउत्पादकता संलग्न (नॉन प्रॉडक्टिव्हीटी लिंक्ड) बोनस मिळणार आहे. उत्पादकता आधारित कर्मचार्यांना या बोनसचा लाभ मिळणार नाही.
अॅडहॉक बोनस देण्यासाठी सरकारकडून एक नियम बनविण्यात आला आहे. त्यानुसार कर्मचार्यांचे सरासरी वेतन, वेतनाची कमाल व उच्चतम मर्यादा यांचा ताळमेळ घालून बोनस निश्चित केला जातो. जर एखाद्या कर्मचार्याचे महिन्याचे मूळ वेतन सात हजार रुपयांच्या आसपास असेल तर त्याला तीस दिवसांचा बोनस म्हणजे 6907 रुपये मिळतील. 31 मार्च 2021 पासून जे सेवेत आहेत, अशाच कर्मचार्यांना बोनसचा लाभ दिला जाणार असल्याचेही अर्थ मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 31 मार्चनंतर या कर्मचार्यांनी सलग सहा महिने सेवा बजावलेली असणे आवश्यक आहे. जे कर्मचारी हंगामी आणि अॅडहॉक तत्वावर नियुक्त करण्यात आले आहेत, त्यांना बोनसचा लाभ मिळेल. त्यांच्या सेवेत कोणताही ब्रेक असता कामा नये, ही यासाठी अट घालण्यात आलेली आहे.