Latest

WTC Final Shubman Gill : तिसर्‍या पंचांनी ढापली शुभमनची विकेट; सोशल मीडियावर संताप

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : दुसर्‍या डावात शुभमन गिलला चुकीच्या पद्धतीने बाद दिल्याने वाद निर्माण झाला आहे. भारताचा धावांचा पाठलाग व्यवस्थित सुरू असताना भारताला पहिला झटका 41 धावांवर बसला. मात्र, ग्रीनच्या या झेलावरून वाद सुरू झाला आहे. स्लीपमध्ये झेल घेत असताना, चेंडू ग्रीनच्या हातात अडकला आणि तो जमिनीवर घासला, पण तिसर्‍या पंचांनी त्याला आऊट दिले. समालोचन करताना दीप दासगुप्ता आणि हरभजन सिंगही शुभमन नाबाद असल्याचे म्हटले. त्यानंतर चाहतेही खूप संतापलेले दिसत होते. सोशल मीडियावर तिसर्‍या पंचांच्या या निर्णयाविरोधात अनेक मिम्स व्हायरल होत होते.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या डब्ल्यूटीसी अंतिम सामन्याच्या चौथ्या दिवशी विजयासाठी ४४४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल या दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या डावाच्या तुलनेत आत्मविश्वासाने सुरुवात केली. दोघांनी सात षटकांत ४१ धावा केल्या. दोन्ही फलंदाजांकडून उत्कृष्ट फटकेबाजी सुरू होती. मात्र ४१ धावांवर भारताला पहिला धक्का बसला. शुभमन गिलने स्लीपमध्ये उभ्या असलेल्या कॅमेरून ग्रीनच्या हाती झेल दिला. कॅमेरूनने डाव्या हाताने जवळजवळ जमिनीला स्पर्श करून कॅच उचलून सर्वांना आश्चर्यचकित केले. हा निर्णय थर्ड अंपायरकडे गेला, अंपायरला निर्णय घ्यायला बराच वेळ लागला. पण जेव्हा गिलला आऊट करण्यात आले, तेव्हा सोशल मीडियावरील चाहत्यांनी संताप व्यक्त केला. भारताचा माजी क्रिकेटर सेहवागनेही ट्विट केले आहे. "जेव्हा तिसरा पंच पुराव्याच्या आधारे निष्कर्षापर्यंत पोहोचू शकला नाही, तेव्हा तो नॉट आउट होता," असे त्याने ट्विटमध्ये लिहिले आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT