पुढारी ऑनलाईन डेस्क : 'अति राग, भीक माग' या कठोर शब्दातील म्हणीतून आपल्याला राग किती वाईट असतो, या वास्तवाची जाणीव हाेते. राग येणे ही स्वाभाविक भावना आहे. क्रोध, संताप, राग हे सारे समानार्थी शब्द तुमच्या मनाची एक नकारात्मक अवस्थाच असते. त्यामुळेच रागीट व्यक्तीचे नेहमी नुकसानच होते. ( Anger management) काही क्षणाचा राग कधीकधी व्यक्तीचे आयुष्य उद्ध्वस्त करु शकते. कारण राग हा व्यक्त करणार्या व्यक्तीच्या आराेग्यासाठी हानीकारक असतोच त्याचबरोबर त्याच्या सहवासात असणार्या प्रत्येकासाठीही तो तितकाच घातक ठरताे. विविध विषयांवरील ऑनलाईन मार्गदर्शक आणि बेस्टसेलर पुस्तकांचे लेखक अंकुर वारिकू हे राग नियंत्रीत करण्यासाठी तीन टीप्स सूचवतात. जाणून घेवूया काय आहेत त्या तीन टीप्स…
जेव्हा आपली महत्त्वाची गरज पूर्ण होत नाही, कोणीतरी खोटे बोलले वा कोणी तुमच्यावर नियंत्रण
ठेवण्याचा प्रयत्न करतो, अशा विविध कारणांमुळे राग येत असतो. वयानुसार त्याचे कारणही बदलत असतात. राग येणे ही
स्वाभाविक भावना आहे. त्यामुळेच तुम्हाला राग येणारच नाही असे होत नाही. मात्र तुम्ही त्याचे व्यवस्थापन करुन स्वत: आणि तुमच्या सहवासात असणार्यांची प्रत्येकाची काळजी घेवू शकता.
रागावर नियंत्रण करण्याची पहिली पायरी म्हणजे, तुम्हाला कशाचा राग येतो आणि तुम्हाला राग येणार आहे हे ओळखायला शिकणे. राग येणार आहे हे ओळखायला शिकणेच तुम्हाला रागावर नियंत्रण मिळविण्यासाठी फार उपयोगी ठरते. कारण राग येणार हे माहिती झाल्यानंतरच तुम्ही रागावर नियंत्रण ठेवू शकता. मात्र यासाठी तुम्हाला सराव करावा लागेल. राग कशाचा येताे याचे तुम्ही निरीक्षण करायला सुरुवात करा. हळूहळू सरावाने तुम्हाला कशाचा राग येताे हे स्पष्ट हाेईल. रागाचे मूळ कारण समजणे हे खूप महत्त्वाचे आहे. हीच रागावर
नियंत्रण ठेवण्याची पहिली पायरी आहे.
तुम्हाला एखाद्या गोष्टीचा राग आला तर १ ते १०पर्यंत अंक मोजा आणि दीर्घश्वसन करा. तुम्हाला हे वाचायला मजेशीर वाटेल;पण हा उपाय खूपच फायदेशीर ठरतो. दीर्घ श्वसन म्हणजे संथ श्वसन. यामुळे मन शांत होण्यास खूपच मदत होते. कारण राग आल्यानंतर तुमचा श्वास हा जलद होत असताे. यावेळी तुम्ही जाणीवपूर्वक दीर्घ श्वसन करा. तसेच काहीही झालं तरी मी या क्षणी रागावणार नाही,अशी स्वत:ला सूचना द्या. या स्वयंसूचनेमुळे तुम्ही रागावर नियंत्रण मिळवू शकता. तुम्ही या सूचनेचे पालन केले तर रागावर नियंत्रणासाठीची अर्धी लढाई तुम्ही जिंकली, असे होईल.
राग आल्यावर त्या क्षणी प्रतिक्रिया देणे टाळा, पहिल्या पायरीत तुम्ही कशामुळे राग येतो हे तपासले. त्यामुळे तुम्ही स्व:निरीक्षकच झालेला असता. एखाद्या भावनेकडे तटस्थपणे पाहणे म्हणजेच ध्यान. ध्यान म्हणजे रस्त्याच्या कडेला बसून गाड्या जाताना पाहण्यासारखे आहे. असे समजा की, राग हा एक कार सारखाच आहे. तुम्ही त्याकडे केवळ पाहाता, तुम्ही त्याचा रंग, वेग आणि रचना लक्षात येते. पण तुम्ही या कारला थांबवतही नाही आणि त्यामध्ये बसतही नाही. फक्त कार पाहता. असे करण्यासाठी तुम्हाला या ध्यानाचा सराव करावा लागेल. दिवसभरात काही वेळा तुम्हाला राग येईल. त्यावेळी रागवू नका, त्याचे निरीक्षण करा. काही दिवसांमध्येच तुम्ही रागावर नियंत्रण मिळवू शकता, हे निदर्शनास येईल.
तुम्हाला नेमका कशाचा राग येतो हे तपासा. मनाविरुद्ध गोष्टी घडल्या की तुम्ही संतापता. मनातील प्रत्येक भावनेचा एक उद्देश असतो. रागाचा उद्देश तुम्हाला सावध करणे हा आहे. तुमच्या अपूर्ण गरजा कोणत्या आहेत ते तपासा. कारण राग हा अपूर्ण गरजांमधूनच व्यक्त होत असतो. एखादी व्यक्ती वा परिस्थिती याविरोधात व्यक्त होण्यासाठी राग तुम्हाला येत असतो. त्या क्षणी राग समजून घ्या. काही वेळातच तुमचा राग निघून जाईल. वरील तीन टीप्सचा वापर करुन तुम्ही रागावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करु शकता. चला तर मग या साेप्या टीप्सचा वापर करुन रागावर नियंत्रण मिळवत स्वत:सह इतरांचीही काळजी घेवूया.
हेही वाचा :