डॉ. प्राजक्ता पाटील
लोहाच्या कमतरतेलाच आपल्याकडे रक्ताची कमतरता म्हणतात. वैद्यकशास्त्रीय भाषेत त्याला हिमोग्लोबिनची कमतरता म्हणतात. हिमोग्लोबिन हा घटक रक्तातील लाल पेशींमध्ये ऑक्सिजनचा साठा करतो आणि रक्त संपूर्ण शरीरात पोचविण्यासाठी मदत करतो.
हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे शरीराच्या विविध ऊतींना ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होत नाही. थकवा, चिडचिडेपणा, ऊर्जेची कमतरता, शक्तिपात ही हिमोग्लोबिनच्या कमतरतेची प्रमुख लक्षणे असतात. काही जणांना श्वास घेताना अडथळा जाणवतो, तर काहीजणांना चक्कर येते. पापण्या आणि नखे फिकी पडणे, नखांचा आकार चमच्यासारखा होणे, जिभेचा दाह, तोंडात विचित्र चव जाणवणे, केस गळणे आणि थंडी सहन न होणे हीदेखील हिमोग्लोबिनच्या कमतरतेचीच लक्षणे. यालाच शास्त्रीय भाषेत 'अॅनिमिया' असे म्हणतात. या लक्षणांव्यतिरिक्त काही गर्भवती महिलांना डोकेदुखी आणि अतिरिक्त खाण्याची इच्छा ही लक्षणे जाणवतात. रक्तातील लोहापासूनच हिमोग्लोबिनची निर्मिती होत असल्यामुळे गर्भावस्थेत लोहाचे प्रमाण शरीरात अधिक असणे गरजेचे ठरते. आहारात पुरेसे लोह नसल्यास हिमोग्लोबिनची कमतरता जाणवू लागते आणि अवयवांना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळू शकत नाही.
याखेरीज फॉलिक आम्लाची कमतरता हे एक कारण होय. बी-12 जीवनसत्त्वाची कमतरता असल्यास अॅनिमिया होतो. याला मेगालोब्लास्टिक अॅनिमिया म्हणतात. फॉलिक आम्ल आणि बी-12 जीवनसत्त्व या दोहोंच्या एकत्रित कमतरतेमुळे जडणार्या आजाराला मायक्रोसायटिक अॅनिमिया असे म्हटले जाते. गर्भावस्थेत लोहाच्या कमतरतेमुळे अॅनिमिया जडण्याची शक्यता सर्वाधिक असते. विविध सर्वेक्षणांमधून मिळालेल्या माहितीनुसार, भारतातील दहापैकी सहा गर्भवती महिला अॅनिमियाने ग्रस्त आहेत. गर्भावस्थेपूर्वी शरीराला लागणार्या लोहाचे प्रमाण (रेकमेन्डेड डाएटरी अलाउन्स-आरडीए) 30 मिलीग्रॅम असते, तर गर्भावस्थेत 38 मिलीग्रॅम लोहाची गरज असते. भारतातील बहुतांश महिलांना गर्भावस्थेत आहारातून पुरेसे लोह मिळत नाही. लोहाच्या शाकाहारी स्रोतांच्या तुलनेत मांसाहारी स्रोतांमधून शरीर लोह अधिक प्रमाणात शोषून घेते. त्यामुळे शाकाहारी महिलांना या अवस्थेत आहाराचे प्रमाण वाढविण्याला पर्याय नाही.
शरीरात आधीच लोहाची कमतरता अधिक असताना दोन किंवा त्याहून अधिक वेळा गर्भधारणा झाल्यास ही कमतरता आणखी वाढते. पहिल्या गर्भधारणेपेक्षा दुसर्या गर्भधारणेच्या वेळी स्त्री अधिक अशक्त होते. गर्भधारणेपूर्वी मासिक पाळीच्या वेळी अधिक स्राव होतो. गर्भधारणेत रक्तस्राव होणे किंवा 'प्लॅसेन्टा प्रिव्हिया'सारखा आजार जडल्याने रक्तस्रावाची जोखीम आणखी वाढते. जुळी गर्भधारणा असल्यास दोन गर्भांच्या पोषणासाठी अधिक लोहाची आवश्यकता असते आणि ते न मिळाल्याने अॅनिमिया होऊ शकतो. वयाच्या विसाव्या वर्षांच्या आत गर्भधारणा होणे अधिक घातक असते.
गर्भावस्थेत सावधगिरी म्हणून महिलेला आयर्नच्या गोळ्या दिल्या जातात. या गोळ्यांमध्ये 100 मिलीग्रॅम लोह आणि 0.5 मिलीग्रॅम फॉलिक आम्ल असते. अॅनिमियाचे प्रमाण कमी असेल, तर आहारात बदल करून हिमोग्लोबिनचा स्तर वाढविण्याचा प्रयत्न केला जातो.
हेही वाचा :