बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : सौंदत्ती मतदारसंघातून सलग तीन वेळा विधानसभेवर निवडून गेलेले आणि विद्यमान विधानसभेचे उपसभापती भाजपचे आमदार आनंद मामणी (वय 56 ) यांच्या पार्थिवावर आज (दि.२३) दुपारी सौंदत्ती येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बंगळूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना शनिवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.
आनंद चंद्रशेखर मामनी यांच्यावर गेल्या कित्येक दिवसांपासून इस्पितळात उपचार सुरू होते. काही दिवसापूर्वी त्यांना उपचारासाठी चेन्नईला हलवण्यात आले होते. दरम्यान, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, शनिवारी त्यांच्या प्रकृतीत पुन्हा बिघाड झाला आणि रविवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला.लिंगायत पंचमशाली समाजातील बेळगाव जिल्ह्यातील ते एक मोठे नेते होते. यांच्या पश्चात पत्नी रचना मामनी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
आज दुपारी सौंदत्ती येथे लिंगायत समाजाच्या विधीनुसार त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई, विधानसभेचे सभापती विश्वेश्वर कागेरी हेगडे, केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी, जिल्ह्याचे पालकमंत्री गोविंद कारजोळ आदीसह मंत्री, खासदार, आमदार, कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचलंत का ?