Indian Economy 
Latest

Indian Economy : जगावर मंदीचे संकट; पण भारतीय अर्थव्‍यवस्‍थेची दमदार घोडदौड : ‘ओईसीडी’

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जगावर आर्थिक मंदीचे संकट असेल तरी भारतीय अर्थव्‍यवस्‍था ही आशियातील सर्वात वेगाने वाढणार्‍या अर्थव्‍यवस्‍थेपैकी एक आहे, असा विश्‍वास आर्थिक सहयोग व विकास संघटनेने ( ओईसीडी ) व्‍यक्‍त केला आहे. ( Indian Economy ) 'ओईसीडी' ही एक जगातील ख्‍यातनाम आंतरराष्‍ट्रीय आर्थिक सहकारी संघटना आहे. भारताचा या वर्षीचा आर्थिक विकास दर हा ६.६ टक्‍के इतका राहिल. यामुळे भारत हा आशिया खंडातील सर्वात वेगाने प्रगती करणार्‍या अर्थव्‍यवस्‍थेपैकी एक असेल, असेही या संघटनेने स्‍पष्‍ट केले आहे.

Indian Economy : भारत वेगाने वाढणारी दुसरी अर्थव्‍यवस्‍था बनण्‍यास सज्‍ज

आर्थिक सहयोग व विकास संघटनेने ( ओईसीडी ) आपल्‍या नुकताच प्रकाशित केलेल्‍या आर्थिक अहवालात म्‍हटलं आहे की, जगभरातील बाजारात मागणीमध्‍ये घट झाली आहे. तसेच चलनवाढीचे व्‍यवस्‍थापन करण्‍यासाठी काही देशांनी आर्थिक धोरण अत्‍यंत कडक केले आहे. तरीही भारताची आर्थिक प्रगती कायम राहिली आहे. भारतीय अर्थव्‍यवस्‍था ही आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्‍ये जी-२० देशातील सौदी अरेबियानंतरची वेगाने वाढणारी दुसरी अर्थव्‍यवस्‍था बनण्‍यासाठी सज्‍ज आहे.

भारतच्‍या विकास दरात होणार लक्षणीय वाढ

ओईसीडीच्‍या अहवालात नमूद केले आहे की, भारताची अर्थव्‍यवस्‍था २०२२-२३मध्‍ये ६.६ टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचेल. यानंतर प्रगतीचा हा वेग कायम राहिल. २०२४-२५मध्‍ये भारताचा विकास दर ७ टक्‍क्‍यांपर्यंत जाईल. आगामी तिमाहित सकल राष्‍ट्रीय उत्‍पन्‍न ( जीडीपी ) ७ टक्‍क्‍यांपर्यंत पोहचेल. २०२३ मध्‍ये आर्थिक वाढ ही आशियातील प्रमुख बाजरांमध्‍ये होणार्‍या वाढीवर अवलंबून आहे. पुढील वर्षी जगाचे सकल राष्‍ट्रीय उत्‍पन्‍नामध्‍ये वाढ होईल. मात्र यामध्‍ये अमेरिका आणि युरोपची कामगिरीत घट होणार आहे.

जागतिक मंदीमध्‍ये भारतीय अर्थव्‍यवस्‍थेचे योगदान ठरेल महत्त्‍वपूर्ण

आर्थिक मंदीमधून जागतिक अर्थव्‍यवस्‍थेचा निभाव लागला तर यामध्‍ये आशियातील सर्वात मोठी भारतासारख्‍या अर्थव्‍यवस्‍थेचे मोठे योगदान असेल. यंदाच्‍या आर्थिक वर्षात जागतिक पातळीवरील अर्थव्‍यवस्‍थेचा विकास दर सरासरी ३.१ टक्‍के राहिल तर पुढील वर्षी म्‍हणजे २०२३ ला ही टक्‍केवारी केवळ २.२ इतकी असेल, अशी शक्‍यताही 'ओईसीडी'ने व्‍यक्‍त केली आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT