American Turtle : दौंड तालुक्यातील सोनवडी येथील मच्छिमाराला 'रेड इअर स्लाईडर' जातीचे अमेरीकन कासव नुकतेच सापडलेआहे. भारतीय कासवांपेक्षा हे अमेरिकन कासव वेगळेच असल्याने आकर्षणाचा विषय बनले आहे. वजनाने व आकाराने हे कासव लहान असले तरी त्याच्यावरील असणारी रंगसंगती डोळ्यांना आकर्षण करणारी ठरत आहे.हे कासव भारतीय नसुन, त्याला नदीनाल्यात,धरणात अथवा मोकळ्या जंगलात सोडल्यास इतर प्रजातींच्या कासवांना धोकादायक ठरु शकते असे मत कासव प्रेमी व अभ्यासक स्नेहा पंचमीया यांनी म्हटले आहे.
दौंड तालुक्यातील जिरेगाव तलावात रविवारी(दि.५ )मासेमारीसाठी गेलेले राजेंद्र केवटे व विशाल मल्लाव यांना हे कासव त्यांच्या जाळ्यात अडकलेल्या अवस्थेत आढळले इतर कासवांपेक्षा हे कासव वेगळे वाटल्याने त्यांनी ही माहिती दै. पुढारी प्रतिनिधीला दिली.विशेष म्हणजे राजेंद्र केवटे यांना गेल्या आठ वर्षांपूर्वी भीमा नदी पात्रात तब्बल दोनशे किलोहून अधिक वजनाचे कासव सापडले होते.
या कासवाच्या कान व डोळ्यामागे लालसर रंगाची छटा आहे तर पोट व पाटीवर नक्षीदार आकार आहे.पाण्यात व जमिनीवर याचे वास्तव्य असते मात्र त्याला दिवसातून किमान दोन तास तरी उष्णता मिळणे गरजेचे आहे.योग्य तापमान त्याला मिळाल्यास रोगराई पासुन बचाव तर होतोच शिवाय त्याला त्यातून एनर्जी मिळते असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. शाकाहारी व मांसाहारी त्याचे खाद्य आहे.या कासवाला पाळणेस बंदी आहे.मात्र पाळायचे असल्यास किचकट प्रक्रिया पार पडावी लागते.
दरम्यान मुळचे अमेरिकन असल्याने हे कासव भारतात कसे आले हा प्रश्न सतावत आहे.पाळण्याच्या दृष्टीने कोणीतरी आणले असावे व नंतर ते सोडून दिले असावे अशीही शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान या कासवाला आता वनविभागाकडे सुपूर्द केले जाणार आहे.याबाबत वनाधिकारी घावटे म्हणाले की,या कासावबाबात तज्ज्ञांशी चर्चा करून शक्यतो संग्रहालयात पाठवण्यात येईल.