पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीरमधील खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा तीन दिवसांसाठी स्थगित करण्यात आली होती. आज (दि. ९) पंजतरणी आणि शेषनाग बेस कॅम्पमधून ही यात्रा पुन्हा सुरू करण्यात आल्याची माहिती येथील अधिकाऱ्यांनी दिली आहे. ते म्हणाले की, अमरनाथ गुहेभोवती आकाश निरभ्र झाल्यानंतर गुहेचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. भाविकांना दक्षिण काश्मीरच्या हिमालयात नैसर्गिकरित्या तयार झालेल्या बर्फाच्या शिवलिंगाचे दर्शन घेण्याची परवानगी देण्यात आले आहे.
पंजतरणी बेस कॅम्पमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, "अगोदरच 'दर्शन' घेतलेल्या यात्रेकरूंना बालटाल बेस कॅम्पवर परत जाण्याची परवानगी देण्यात आली आहे." खोऱ्यात मुसळधार पावसामुळे अडकलेल्या 700 हून अधिक अमरनाथ यात्रेकरूंना लष्कराने अनंतनाग जिल्ह्यातील काझीगुंड येथील छावणीत परत आणण्यात आले आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले, खराब हवामानामुळे आणि जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. जम्मूहून आलेल्या यात्रेकरूंच्या एका तुकडीला पुढे जाऊ दिले नाही. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार भूस्खलनाच्या अनेक घटनांमुळे बंद असलेल्या महामार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रामबन जिल्ह्यात भूस्खलनामुळे ४० मीटरचा रस्ता खचल्याने ३,५०० वाहने अडकून पडली आहेत.
गुरुवारी (दि. ६) रात्रीपासून अमरनाथ गुहेच्या उंच भागाजवळील भागांसह जम्मू-काश्मीरच्या अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवारपासून या भागात हवामानात सुधारणा होण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संततधार पावसामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील ढिगारा हटवण्याचे काम खोळंबले आहे.
हेही वाचा