पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर पदेश विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले माजी मुख्यमंत्री व समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी लोकसभा सदस्यत्व पदाचा आज (मंगळवार) राजीनामा दिला.
उत्तर प्रदेशातील जनतेच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी अखिलेश यादव यांनी राजीनामा दिल्याचे समाजवादी पक्षाचे नेते अनुराग भदौरिया यांनी सांगितले. राजीनामा देण्यापूर्वी यादव यांनी पक्षाच्या प्रमुख नेतेमंडळीशी विचारविनिमय केला. यावेळी उत्तर प्रदेशातील जनतेच्या कल्याणासाठी यादव विधानसभेत असणे आवश्यक असल्याचे मत सर्वांनी व्यक्त केले. त्यानंतर यादव यांनी लोकसभा सदस्यत्व पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
अखिलेश यूपीचे राजकारण सोडण्यास तयार नाहीत. तसेच त्यांचा अधिक वेळ दिल्लीत जात असल्यामुळे त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्यावर अनेकवेळा यूपीपासून दूर जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावर आता दिल्लीचे राजकारण करण्याऐवजी यूपीच्या राजकारणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांनी राज्यात राहण्याचा निर्णय घेतला आहे.
२०१७ मध्ये भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर समाजवादी पक्षाचे राम गोविंद चौधरी विरोधी पक्षनेते होते. आता विरोधी पक्षनेते पद अखिलेश यादव स्वतःकडे ठेवण्याची शक्यता आहे. भाजप सरकारला घेरण्यासाठी या पदाचा ते चांगल्या प्रकारे उपयोग करून घेऊ शकतात. त्यांना ९ वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आझम खान यांची साथ मिळू शकते.
अखिलेश यादव यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने आझमगड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. ही जागा समाजवादी पक्ष पुन्हा जिंकेल, असा विश्वास अखिलेश यादव यांना आहे. आझमगडमधील सर्व १० जागा सपाने जिंकल्या आहेत. त्याचबरोबर रामपूरमध्येही सपाने ५ पैकी ३ विधानसभेच्या जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे लोकसभा पोटनिवडणुकीत सपाचा विजय निश्चित मानला जात आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी यादव यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सर्वाधिक जागा आहेत. त्यामुळे अखिलेश या निवडणुकीत कोणतीही कसर सोडण्यास तयार नाहीत. त्यामुळेच ते आता पूर्णपणे यूपीवर लक्ष केंद्रीत करू शकतात. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यानंतर अखिलेश दिल्लीच्या राजकारणात सक्रीय झाले होते. त्यामुळे राज्यात विरोधी पक्ष कमजोर झाला होता. परिणामी २०१९ आणि २०२२ च्या निवडणुकीत पक्षाने भाजपसमोर नांगी टाकली होती. आता ही चूक पुन्हा करण्याच्या मनस्थितीत अखिलेश यादव नाहीत.
हेही वाचलंत का ?
पहा व्हिडिओ : 'झुंड' मधून नागराज मंजुळेंना नेमकं काय सांगायचं आहे ? : नागराज मंजुळेंशी खास गप्पा | jhund movie