पुढारी ऑनलाईन डेस्क : अफगाणिस्तानने वर्ल्ड कप 2023 मधील शेवटच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 245 धावांचे लक्ष्य दिले आहे. संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 9 गडी गमावून 244 धावा केल्या. अजमतुल्ला उमरझाईने झुंझार नाबाद 97 धावा फटकावल्या. त्याला रहमत शाहने 26, नूर अहमद 26, रहमानउल्ला गुरबाज 25 आणि रशीद खानने 14 धावांची उपयुक्त साथ दिली. दक्षिण आफ्रिकेकडून जेराल्ड कोएत्झीने 4, तर केशव महाराज आणि लुंगी एनगिडीने प्रत्येकी 2 बळी घेतले. (AFG vs SA)
अफगाणिस्तानची सुरुवात चांगली झाली होती. दोन्ही सलामीवीरांनी 8 षटाकांत 41 धावा जोडल्या होत्या. पण 9व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर केशव महाराजने रहमानउल्ला गुरुबाजला (25) बाद करून ही जोडी फोडली. यानंतर अफगाणिस्तानची पडझड सुरू झाली. त्यानंतर इब्राहिम झद्रान (15), रहमत शाह (26), हशमतुल्ला शाहिदी (2), इकराम अलीखेल (12), मोहम्मद नबी (2) आणि रशीद खान (14) विशेष कामगिरी करू शकले नाहीत. या डावाची मधली षटके दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांच्या नावावर राहिली.
दरम्यान, अजमतुल्ला ओमरझाईने रहमत शहासोबत 49 आणि रशीदसोबत 44 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. या भागीदारींच्या जोरावर संघाला दीडशे धावांचा टप्पा ओलांडता आला. 40व्या षटकानंतर संघाची धावसंख्या 7 बाद 173 होती.
अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी डेथ ओव्हर्समध्ये चमकदार कामगिरी केली. रशीद बाद झाल्यानंतर अजमतुल्ला उमरझाईने नूर अहमद (26 धावा) सोबत 44 आणि मुजीब उर रहमानसोबत 22 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. तो 97 धावा करून नाबाद परतला. संघाने शेवटच्या 10 षटकांत 3 गडी गमावून 71 धावा केल्या.
अफगाणिस्तान संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र, द. आफ्रिका संघात दोन बदल करण्यात आले आहेत. मार्को जॅन्सन आणि तबरेझ शम्सी यांना विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्या जागी अँडील फेलुक्वायो आणि जेराल्ड कोएत्झी यांचा समावेश करण्यात आला आहे. (AFG vs SA)
अफगाणिस्तान संघ : रहमानुल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), अजमातुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, रशीद खान, इक्रम अलीखिल (विकेटकीपर), मुजीब उर रहमान, नूर अहमद, नवीन-उल हक.
दक्षिण आफ्रिका संघ : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडेन मार्कराम, हेनरिक क्लासेन, अँडिले फेहलुकवायो, डेव्हिड मिलर, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी. (AFG vs SA )