No Confidence Motion  
Latest

ADR Report | मुख्यमंत्री शिंदेंकडे ११ कोटींची संपत्ती; एडीआर रिपोर्टमधील माहिती

मोनिका क्षीरसागर

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: देशातील ३० पैकी २९ म्हणजे ९७ टक्के मुख्यमंत्री कोट्यधीश असून, यादीत ५१० कोटी रुपयांच्या संपत्तीसह आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी हे आघाडीवर आहेत. तर प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे सर्वात कमी म्हणजे १५ लाख रुपयांची संपत्ती आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे ११ कोटींची संपत्ती असल्याची माहिती एडीआरने (ADR report) दिलेल्या अहवालात म्हटले आहे. देशातील मुख्यमंत्र्याच्या संपत्तीविषयीची माहिती असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्मस संस्थेकडून [एडीआर] बुधवारी (दि.१२) देण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ११ कोटी ५६ लाख १२ हजार रुपयांची संपत्ती आहे. सर्वाधिक देणे असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत शिंदे तिसऱ्या क्रमांकावर असून, त्यांची देणी ३ कोटी ७४ लाख ६० हजार रुपयांची आहेत. सर्वाधिक देणी असलेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये तेलंगणचे के. चंद्रशेखर राव ८ कोटी ८८ लाख रुपयांसह पहिल्या तर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई ४ कोटी ९९ लाख रुपयांसह दुसऱ्या क्रमांकावर (ADR report) आहेत.

ADR Report : चंद्रशेखर राव यांच्यावर सर्वाधिक ६४ तर महाराष्ट्राच्या शिंदेंवर १८ गुन्हे

सर्वाधिक गुन्हे दाखल असलेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये चंद्रशेखर राव ६४  गुन्ह्यांसह पहिल्या क्रमांकावर आहेत. यात ३७ गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्यावर ४७ गुन्हे दाखल असून, त्यातील दहा गुन्हे गंभीर स्वरुपाचे आहेत. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या जगनमोहन रेड्डी यांच्यावर ३८ गुन्हे असून, त्यातले ३५ गंभीर स्वरूपाचे आहेत. तर चौथ्या क्रमांकावर असलेल्या एकनाथ शिंदे यांच्यावर १८ गुन्हे दाखल असून, त्यातील एक गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे, असे ADR रिपोर्ट मधून सांगण्यात आले आहे.

देशातील सर्व मुख्यमंत्र्यांची सरासरी संपत्ती ३३.९६ कोटी

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या प्रतिज्ञा पत्राचा आधार घेत एडीआर आणि इलेक्शन वॉच या संस्थांनी हा अहवाल बनविला आहे. जम्मू काश्मीरमध्ये सध्या मुख्यमंत्री नसल्याने हे राज्य वगळण्यात आले आहे. सर्व मुख्यमंत्र्यांच्या सरासरी संपत्तीचा आकडा काढला, तर तो ३३.९६ कोटी रुपये इतका भरतो. ३० पैकी १३ म्हणजे ४३ टक्के मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण आदी स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे तीन कोटी संपत्ती

ज्या मुख्यमंत्र्यांची संपत्ती सर्वाधिक आहे, त्यात जगनमोहन यांच्यापाठोपाठ अरुणाचल प्रदेशचे पेमा खंडू दुसऱ्या क्रमांकावर आहेत. खंडू यांची संपत्ती १६३ कोटी रुपये इतकी आहे. ओडिशाचे नवीन पटनाईक ६३ कोटी रुपयांच्या संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. कमी संपत्ती असलेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये प. बंगालच्या ममता बॅनर्जी यांच्याकडे अवघी १५ लाखांची संपत्ती असून, केरळच्या पी. विजयन तसेच हरियानाच्या मनोहरलाल खट्टर यांच्याकडे प्रत्येकी एक कोटी रुपयांची संपत्ती आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे प्रत्येकी तीन कोटी रुपयांची संपत्ती आहे. (ADR Report)

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT