ठाणे ; पुढारी वृत्तसेवा : मुंबई, ठाण्यासह राज्यातील १८ महापालिकांच्या निवडणुका प्रलंबित असताना या निवडणुकांवरून युवा सेनाप्रमुख आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे. हे सरकार निवडणुका लावण्याची हिंमत दाखवत नसल्याचा टोला ठाकरे यांनी शिंदे सरकारला लगावला आहे. शिवसेनेत हा गट तो गट असे काहीच नसून, जे गेले ते गद्दार गेले आणि इथे सर्व निष्ठावानच राहिले आहेत. त्यामुळे हे सरकार अल्पावधीत कोसळणारच असा पुनरुच्चार पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
ठाणे महापालिकेचे माजी नगरसेवक नरेश मणेरा यांच्यावतीने ठाण्यात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्याचे उद्धाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी खा. राजन विचारे यांच्यासह खा. अरविंद सावंत तसेच शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. ठाण्यात एकीकडे निष्ठावान शिवसैनिकांकडून ठाण्यात रोजगार मेळावे आयोजित करण्यात येतात तर दुसरीकडे ठाण्याच्याच एका गद्दारीने महाराष्ट्रातील उद्द्योग गुजरातला नेले असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली. राज्यात काही नवीन चर्चा होत नाही. केवळ एकच कॅसेट वाजवली जात असून, यामध्ये कार्यक्रम कोणताही असो त्यात आम्ही सहा महिन्यांपूर्वी काय केले ही एकच टेप वाजवली जात असल्याचा टोला त्यांनी लगावला.
शिवसेनेचा जन्म हा रोजगार आणि स्थानिकांना न्याय देण्यासाठी झाला आहे. मात्र हे सरकार उद्योग बाहेर पाठवण्याचे काम करत आहे. ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. त्यावेळी हेच लोक टेबलावर नाचले होते. या मानसिकतेचाही ठाकरे यांनी निषेध केला. शिवसेनेची भूमीका स्पष्ट असून, रोजगाराची संधी असल्यास मराठी मुलांनी जगात कुठेही जाण्याची तयारी ठेवली पाहिजे असे ते म्हणाले.
शिंदे सरकारवर टीका करताना ठाकरे यांनी हे सरकार मोगलांचे सरकार असून, या सरकारच्या मंत्रिमंडळात एकाही महिलेचा समावेश नाही. या सरकारमध्ये शेतकऱ्यांचा आवाज दाबला जात असून, राज्यात एवढे प्रश्न असताना तरुणांमध्ये जाती आणि धर्माच्या नावावर भांडणे लावण्यात येत आहेत. दुसरीकडे राज्यातील महापालिकांच्या निवडणूका प्रलंबित असताना हे सरकार निवडणूका लावण्याची हिंमत का दखवत नाही, असा प्रश्न देखील ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.
हेही वाचा :