नवी दिल्ली; वृत्तसंस्था : हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर फसवणुकीचे आरोप केल्यानंतर बँकांनी अदानी यांच्या वित्त स्थितीची छाननी सुरू केली आहे. यातून सावध होत, सिटी ग्रुपच्या संपत्ती व्यवस्थापन विभागाने मार्जिन कर्जासाठी तारण म्हणून अदानी समूहाच्या कंपन्यांचे रोखे स्वीकारणे बंद केले आहे. (Adani Group Crisis)
क्रेडिट सुईस या कंपनीच्या बँकिंग विभागाने काल अदानी पोर्टस्, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई यांच्याद्वारे विकल्या गेलेल्या रोख्यांचे मूल्य शून्य असल्याचे काल नमूद केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर लगेचच आज सिटी ग्रुपनेदेखील अदानी समूहाला कर्ज देण्यावरही मर्यादा घातली. (Adani Group Crisis)
गेल्या काही दिवसांत अदानी समूहातर्फे जारी झालेल्या रोख्यांच्या किमतीत मोठी घट होत चालली आहे. या समूहाच्या आर्थिक स्थितीविषयीच्या नकारात्मक बातम्यांमुळे स्टॉक्स आणि बाँडच्या किमती घसरल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अदानी एंटरप्रायझेस कंपनीने जारी केलेल्या सर्व रोख्यांवरील कर्ज मूल्य काढून टाकण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. हा निर्णय तत्काळ अमलात येईल, असे सिटी ग्रुपने एका निवेदनात म्हटले आहे. (Adani Group Crisis)
गौतम अदानी यांच्या अदानी एंटरप्रायझेस या फ्लॅगशिप कंपनीचे बाँडस् यूएस ट्रेडिंगमध्ये काल अडचणीत आले आणि त्यानंतर अदानी समूहातील समभागांना 92 अब्ज डॉलर्सच्या घसरणीस सामोरे जावे लागल्याने या कंपनीने काल रात्री अचानक आपला एफपीओ मागे घेतला. या नकारात्मक घडामोडींचा आणखी परिणाम अदानी समूहातील कंपन्यांवर गुरुवारी भारतीय शेअर बाजारांत झाला आणि त्यांचे भाव आणखी ढासळले.
अदानीचे शेअर १० टक्क्यांनी घसरले
अदानी समूहाच्या शेअर्सची मोठी विक्री अजूनही सुरूच असल्याने गुरुवारी शेअर बाजारात अस्थिर वातावरण कायम राहिले. शेअर निर्देशांक संमिश्र अवस्थेत बंद झाले. बीएसईचा सेन्सेक्स 224.16 अंकांनी (0.38 टक्क्के) वाढून 59,932.24 वर बंद झाला, तर निफ्टी सहा अंकांनी (0.03 टक्के) घसरून 17,610.40 वर बंद झाला.
अदानी एंटरप्रायझेसने फॉलो-ऑन पब्लिक ऑफरिंग (एफपीओ) रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर अदानी समूहाच्या समभागांमध्ये विक्रीचा जोर वाढला, त्यापैकी बहुतेकांना लोअर सर्किट लागला. अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी टोटल गॅस, अदानी पॉवर आणि अदानी विल्मर हे 5 ते 10 टक्क्यांनी घसरले. अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पोर्टस् अनुक्रमे 26 टक्के आणि 6.5 टक्के घसरले.
अदानी एंटरप्रायझेस, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी पोर्टस्, अदानी ट्रान्समिशन, झी मीडिया कॉर्पोरेशन आणि रिलॅक्सो फूटवेअर्स आदी शेअर्स बीएसईवर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर गेले.
अधिक वाचा :