Abhishek Ghosalkar मॉरिसच्या पत्नीची भावना 
Latest

Abhishek Ghosalkar : माझ्या मुलीने बाप गमावला, तितकेच वाईट घोसाळकरांच्या मुलाचे वाटते; मॉरिसच्या पत्नीची भावना

अनुराधा कोरवी

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मॉरिसने जे काही केले त्याचा मला आयुष्यभरासाठी पश्चात्ताप असेल. माझ्या मुलीने वडील गमावले म्हणून मी जितकी दुःखी आहे तितकेच वाईट मला अभिषेक घोसाळकर यांच्या मुलाविषयीही वाटत आहे, अशा शब्दात मॉरिसची पत्नी सरिना नोरोन्हाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मॉरिसने हे कृत्य केले आहे, यावर आमचा विश्वासच बसला नाही, असेही मॉरिसच्या पत्नीने म्हटले आहे. (  Abhishek Ghosalkar )

संबंधित बातम्या 

माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची मॉरिस नोरोन्हा या स्वयंघोषित नेत्याने गुरुवारी 8 फेब्रुवारीला गोळ्या झाडून हत्या केली. मॉरिसने आधी अभिषेक घोसाळकर यांच्यासह फेसबुक लाईव्ह केले. त्यानंतर त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर स्वतःवर गोळ्या झाडल्या आणि आत्महत्या केली. अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर चार दिवसांनी मॉरिसच्या पत्नीची सविस्तर प्रतिक्रिया समोर आली आहे.

मला प्रकर्षाने एक गोष्ट मॉरिसविषयी सांगायची असेल तर ती एकच आहे की, एखाद्याला इतकाही त्रास देऊ नये की त्याचे परिणाम इतके वेदनादायी असतील. जी घटना घडली त्यासाठी मॉरिसचे शत्रूही जबाबदार आहेत. मॉरिसवर दाखल करण्यात आलेल्या गुन्हेगारी केसेस राजकीय हेतूने प्रेरित होत्या. मॉरिसच्या शत्रूंनी षडयंत्र रचून त्याला बलात्काराच्या गुन्ह्यात गोवले होते. ही गोष्ट वगळली तर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल नव्हता, असेही ती म्हणाली.

मॉरिस तुरुंगातून सुटल्यापासून दबावाखाली होता. मॉरिसचे सामाजिक काम आणि बॅनर याबाबत अनेकांनी आक्षेप नोंदवले होते. त्याच्या शत्रूंनी अमेरिकन दूतावासाकडे त्याच्याबाबत पत्रं पाठवली होती. मॉरिस हा गुन्हेगार असल्याचे लिहिले होते. परिणामी अमेरिकन दूतावासाकडून मॉरिसला समन्स पाठवण्यात आले होते. मॉरिसला जामीन मिळाल्यानंतर त्याला अमेरिकेला जायचे होते. मात्र, तुझ्यावरील गुन्हेगारी प्रकरणे निकाली निघाल्याशिवाय तुला अमेरिकेला जाता येणार नाही, असे दूतावासाकडून सांगण्यात आले होते, अशी माहिती तिने दिली.

सरिनाने सांगितले की, मी ऑफिसमध्ये असताना मला आईचा फोन आला. तिने मला अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याचे सांगितले. त्यावर मी काही बोलले नाही. थोड्यावेळाने मला एका मित्राने फोन करून सांगितले की, अभिषेकवर गोळीबार करणारा मॉरिस होता. तेव्हा मला विश्वासच बसला नाही. त्यानंतर आणखी एकाने मला मॉरिसनेच अभिषेकवर गोळ्या झाडल्याचे सांगितले. ते ऐकून मला खूपच धक्का बसला. तेव्हा माझी मुलगी एकटीच घरी होती. मी आईला तातडीने तिच्याकडे पाठवले.

माझ्या मुलीला सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे या घटनेबद्दल कळाले. सोशल मीडियावर मॉरिस गुंड असल्याचे सांगितले जात आहे. पण हे खरे नाही. माझ्या मुलीला या सगळ्यामुळे खूप त्रास झाला. तिने अन्नपाणी सोडले आहे, आपले वडील परत येतील, अशी आशा तिला वाटते, असेही तिने सांगितले. (  Abhishek Ghosalkar )

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT