बारामती ; पुढारी वृत्तसेवा : मोटार विक्रीच्या जुन्या व्यवहाराच्या कारणावरून बारामतीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचे जबरदस्तीने गाडीतून अपहरण करण्यात आले. तसेच त्या विद्यार्थ्याचा रस्सीने गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी सहाजणांविरोधात पुणे जिल्ह्यातील बारामती तालूका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नितीन बाळासाहेब कदम (वय २३, ता. माढा, जि. सोलापूर) असे अपहरण झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. यासंबंधी मनोज उर्फ बंडू रामदास मुळे (रा. तराळवस्ती, टेंभुर्णी) याच्यासह अन्य पाचजणांचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे. या युवकाचे बारामतीतील एका जीममधून अपहरण करून त्याला ठाणे जिल्ह्यातील माळशेज घाटाजवळ आंबे कार्नर येथे फेकून दिले होते.
फिर्यादीत नमूद केल्यानूसार नितीन हा बारामतीत महाविद्यालयीन शिक्षण घेतो. त्याच्याकडे एम. एच. ४२ एक्स ९२९६ या क्रमांकाची स्कार्पिओ गाडी होती. ती त्याने ओळखीच्या मनोज उर्फ बंडू मुळे याला विकली. ऑगस्ट २०२० मध्ये नोटरीद्वारे व्यवहार करण्यात आला. ही गाडी मुळे यांच्या ताब्यात देण्यात आली.
परंतू मुळे याने व्यवहार ठरल्याप्रमाणे पूर्ण पैसे दिले नाहीत. त्यामुळे फिर्यादीने टीटी फॉर्मवर सह्या केल्या नाहीत. टेंभुर्णी पोलिस ठाणे व सोलापूर पोलिस अधिक्षकांना त्याच्या विरोधात अर्ज देण्यात आला. या गोष्टीचा त्याला राग आला होता. त्यामुळे तो नितीन याला धमकावत होता.
रविवारी (दि. २१) नितीन हा बारामतीत जीममध्ये व्यायाम करत असताना मुळे हा अन्य पाच साथीदारांसह तेथे आला. त्याने फिर्यादीला तु मुलीची छेड काढली आहे, भिगवण पोलिस स्टेशनला चल असे सांगितले. त्यावर फिर्यादीने मी कोणाचीही छेड काढली नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी काहीही ऐकून न घेता स्कॉर्पिओ गाडीत बसवले.
भिगवणकडून करमाळा रस्त्याकडे त्यांनी हे वाहन नेले. तेथे रात्री नऊ वाजता त्याच्याकडील मोबाईल काढून घेतला. गाडी नावावर करून घेण्यासाठी टी. टी. फॉर्मवर सह्या करण्यास सांगण्यात आले. फिर्यादीने नकार दिल्याने त्यांनी लोखंडी टॉमी डोक्यात मारली. टी. टी. फार्मवर जबरदस्तीने अंगठा घेत ते गाडीतून खाली उतरले. त्यातील एकाने रस्सी आणली. त्याने फिर्यादीला बांधण्यात आले. चेहऱ्यावर टॉवेल टाकण्यात आला. याला मारुन मृतदेह माळशेज घाटात टाकू अशी चर्चा त्यांच्यात सुरु होती.
मुळे याने गळा रस्सीने आवळला. त्यात फिर्यादी बेशुद्ध पडला. त्याला जाग आली तेव्हा तो कोणत्या ठिकाणी आहे हे समजत नव्हते. घाटातून चालत तो पायी वर गेला. तेथे काम सुरु असलेल्या कामगारांना त्याने हे ठिकाण कोणते आहे अशी विचारणा केली असता आंबे कार्नर, माळशेज घाट असल्याचे त्याला सांगण्यात आले. एका ट्रकचालकाची मदत घेत फिर्यादी लगतच्या टोकावडे पोलिस स्टेशनला गेला. तेथून त्याने कुटुंबियांना फोन करत ही घटना सांगितली. उपचारानंतर त्याने बारामतीत आल्यावर या प्रकरणी फिर्याद दिली.