अभिनेत्री स्वरांगी मराठे 
Latest

आई कुठे काय करते : अभिनेत्री स्वरांगी मराठेची होणार एन्ट्री, अरुंधती आणि आशुतोषच्या नात्यात येणार नवं वळण

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते' मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. आशुतोषच्या वाढदिवशी अरुंधती आशुतोषच्या बाबतीतला सर्वात मोठा निर्णय घेणार होती. मात्र अनुष्काच्या एन्ट्रीने अरुंधतीला तिच्या निर्णयावर पुन्हा विचार करावा लागणार आहे. अनुष्का म्हणजेच आशुतोषची खूप जुनी मैत्रीण. बऱ्याच वर्षांनंतर या दोघांची पुन्हा भेट होणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री स्वरांगी मराठे अनुष्का ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.

अनुष्का या व्यक्तिरेखेबद्दल सांगताना स्वरांगी म्हणाली, 'मी आई कुठे काय करते या मालिकेची खूप मोठी चाहती आहे. खऱ्या आयुष्यात मी दोन मुलांची आई असल्यामुळे आई काय काय करु शकते याचा अनुभव घेतच आहे. अशातच या भूमिकेसाठी विचारणा झाल्यावर क्षणाचाही विलंब न लावता मी होकार दिला. घरच्यांची खंबीर साथ असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नसते. गेले कित्येक दिवस स्वरांगी तू सध्या काय करतेस हा प्रश्न मला नेहमी विचारला जायचा. आता मी अभिमानाने सांगू इच्छिते की, स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेमध्ये मी अनुष्का ही व्यक्तिरेखा साकारतेय. शूटिंगच्या पहिल्याच दिवशी यश म्हणजेच अभिनेता अभिषेक देशमुखने सेटवर सर्वांची ओळख करुन दिली. देशमुख कुटुंबाने मला सामावून घेतलं आहे. सेटवर खूपच सकारात्मक वातावरण आहे. त्यामुळेच काम करताना खूप मजा येतेय. आमचे दिग्दर्शक रवींद्र करमरकर यांच्यामुळे अनुष्का हे पात्र खुलवण्यासाठी खूप मदत होतेय, अशी भावना स्वरांगी मराठेने व्यक्त केली.'

अनुष्काच्या येण्याने अरुंधती आणि आशुतोषच्या नात्यात कोणतं वळण येणार हे पाहाणं उत्सुकतेचं असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT